अहमदनगर - जिल्ह्यात गेले दीड वर्षांपासून कोरोना (Corona) महामारीने थैमान घातले होते. मात्र सुमारे जवळपास एक वर्षानंतर आज कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona positive Cases) बाबतीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
नगर जिल्ह्यात दैनंदिन कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. प्रशासनाने वारंवार कडक निर्बंध लागू केले होते, तसेच अनेकदा कडक लॉकडाऊन (Lockdown) देखील जाहीर करण्यात आले होते. तरीही कोरोना बधितांची संख्या वाढतच होती.
सोमवारी मात्र दिवसभरातील कोरोना रुग्णांची संख्या शंभराच्या आत आली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात अवघे ९७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. ही बाब दिलासा देणारी आहे. कारण कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये नगर जिल्ह्यात अपरिमित हानी झाली.
कोरोना महामारीचा प्रभाव देखील इतका होता की बेड (Bed) न मिळाल्याने, वेळेवर उपचार न मिळाल्याने, तसेच ऑक्सिजन (Oxygen) उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. जिल्ह्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली होती.
परंतु दुसरीकडे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गर्दीही केली. त्यामुळेही संसर्ग वाढत होता. परंतु जसजसे लसीकरणाचे प्रमाण वाढत गेले, तसतसे कोरोना बधितांचा आकडाही कमी कमी होत चालला आहे.