अहमदनगर - घोडेगाव (ता. नेवासा) येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ. ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी कोरोनो नियमांचे सर्व पालन करून विद्यालय सुरू केले जात असल्याचे सांगितले. विद्यालय परिसर व वर्गखोल्या सॅनिटायझेशन केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिमीटरने तपासणी करून, सक्तीने मास्क वापरण्याच्या, तसेच सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना देऊन त्यांना वर्गात प्रवेश दिला जात आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तक वितरण करताना पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटील सोनवणे, सरपंच राजेंद्र देसरडा, उपसरपंच यशवंत येळवंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद सोनवणे, उपाध्यक्ष प्रशांत लोंढे, सदस्य अलीभाई शेख, महेश पटारे, उपप्राचार्य बाळासाहेब चव्हाण, पर्यवेक्षिका संगिता शिंदे, शिक्षक बाळासाहेब झाडे, उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी कोरोनाबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत महेश पटारे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब कदम सर यांनी केले. शाळा सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी विद्यालयात सर्व इयत्तांचे मिळून सुमारे पाचशे विद्यार्थी उपस्थित होते.