अहमदनगर - गावठी पिस्तुलाच्या जोरावर एका प्रतिष्ठित महिलेचे अपहरण करून 'माझ्याशी संबंध ठेव', असे सांगत मारहाण करण्याऱ्या निलंबित पोलिसाने हा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी चक्क महिलेच्या घरात घुसून तिच्या मुलांना बंदी केले होते.
श्रीरामपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी मात्र धाडस दाखवून सर्वांची सुखरुप सुटका केली. या थरारनाट्यात घटनास्थळी दोन राउंड फायर करण्यात आले. परंतु, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
'माझ्यावर खोटा गुन्हा दाखल का केला?' असे म्हणत या पोलिस अधिकाऱ्याने महिलेच्या घरी गोळीबार करून धुडगूस घातला. महिलेच्या मुलांना डांबून ठेवले. त्यांना वाचविण्यास गेलेले श्रीरामपूरचे पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने पिस्तुल रोखले.
मिटके यांनी प्रसंगावधान राखत गोळी चुकवली. सोबतच्या पोलिसांच्या पथकाने तत्काळ निलंबित पोलिस अधिकाऱ्याला झडप घालून ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा थरार घडला.
नाशिक उपविभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर हे देखील या घटनेवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. त्यांनी शुक्रवारी सकाळीच नगरमध्ये दाखल होत घटनेची अधिक माहिती घेतली. तसेच पुढील तपासाच्या दृष्टीने सूचना दिल्या.
तसेच या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांनी कौतुक केले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी निलंबित पोलिस अधिकारी असून त्याने एमपी, युपी राज्यातून अवैध शस्त्रे आणलेली होती. त्याबद्दलही त्याची कसून चौकशी केली जात आहे.