अहमदनगर - जिल्हा माहिती अधिकारी या पदावर डॉ. रवींद्र ठाकुर यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार घेतला.
डॉ. रवींद्र ठाकूर यापूर्वी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक म्हणून वृत्त शाखेत कार्यरत होते. ठाकुर यांची सन २००६ पासून जिल्हा माहिती अधिकारी, रायगड (अलीबाग) या कार्यालयात माहिती अधिकारी या पदावर शासकीय सेवेची सुरूवात झाली.
त्यानंतर २००९ ते २०११ या कालावधीत माहिती व जनसंपर्क विभागात मुंबई येथे सहायक संचालक पदावर त्यांनी काम केले. २०११ ते १४ या कालावधीत नाशिक जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात माहिती अधिकारी पदावर त्यांनी काम केले.
सन २०१४ ते २०१६ या कालावधीत औरंगाबाद येथील संचालक (माहिती) कार्यालयात सहायक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर २०१६ पासून पुन्हा मुंबई येथे वृत्तशाखेत सहायक संचालक (माहिती) म्हणून कार्यरत होते.
ठाकुर हे मुळचे जळगांव येथील असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जळगांव व पुणे येथे झाले आहे. त्यांनी पत्रकारिता विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएचडी पदवी संपादन केली. त्यांनी वृत्तपत्रात, आकाशवाणीत काम केले असून पत्रकारिता विभागात प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी वरिष्ठ लिपिक संतोष गुजर, सिनेयंत्रचालक धनंजय जगताप, कनिष्ठ लिपिक सुरज लचके, वाहनचालक अरुण सोनवणे उपस्थित होते.
पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. ठाकुर यांनी उपमाहिती कार्यालय, शिर्डी येथे भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले. यावेळी माहिती सहायक जयंत करपे, छायाचित्रकार सुनिलदत्त शिवदे, कनिष्ठ लिपिक प्रविण पाटील उपस्थित होते.