मुंबई - अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या.
पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे लावून जे हे करीत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. कोविडमध्ये आपण खूप चांगली कामगिरी केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रस्ते, पदपथ, स्वच्छता, नागरी सुविधांच्या बाबतीत पूर्णपणे लक्ष केंद्रीत करून कालबद्ध रीतीने ती कामे पूर्ण करा आणि मुंबई शहराचा देशात आदर्श निर्माण करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीस पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, सहायक आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
मुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्यकठोरपणे यावर तातडीने कारवाई कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. कुणालाही बोट उचलण्याची संधी मिळाली नाही पाहिजे हे पहा असेही ते म्हणाले.