नाशिक - जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. लसीकरणाचा वेग विक्रमी वाढवण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोहिम गतीमान करण्यात येईल.
जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधाची वेळ न येवू देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
भुजबळ म्हणाले, नवरात्रोत्सव, दसरा दिवाळी यासारख्या सणांच्या निमित्ताने व बाजारांच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना मास्क, सॅनिटाईजर, व सुरक्षित अंतराच्या नियमांचा अंगिकार केला नाही तर पुन्हा परिस्थिती गंभीर होवू शकते.
मालेगाव येथून कोरोना विषयक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषीमंत्री दादाजी भुसे, तर प्रत्यक्ष बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नरेंद्र दराडे, डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, आदी उपस्थित हाेते.
त्यामुळे वेळ आल्यास निर्बंधही कठोर करावे लागतील. प्रवासावर बंधने शिथिल झाल्यानंतर नागरिकांचा मुक्तसंचार तालुक्यात व जिल्हास्तरावर होत आहे. सर्वांवर सरसकट बंधने आणने अव्यावहारिक आहे. त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायला हवी.