अहमदनगर - नगर-वांबोरी (ता. नगर) रस्त्यावरील पिंपळगाव माळवी तलाव पुर्ण क्षमतेने भरुन तलावाच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजाच्या पालात पाणी शिरल्याने बिकट परिस्थिती उद्भवली. तलावाचे पाणी राहत्या पालात शिरलेल्या आदिवासी बांधवांना बॉस्को ग्रामीण विकास केंद्राकडून किराणा किटसह अन्न-धान्याची मदत देण्यात आली.
तसेच आदिवासी कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बॉस्को ग्रामीण विकास केंद्र व ट्रेसलिंक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पिंपळगाव माळवी तलाव परिसरात राहत असलेल्या 150 आदिवासी कुटुंबियांना ही मदत देण्यात आली.
यावेळी बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज, उपसंचालक फादर नेल्सन यांच्या हस्ते या मदतीचे वितरण करण्यात आले. पाण्यामुळे परिसर चिखलाने माखला असताना या परिसरात साथीचे आजार रोखण्यासाठी डॉ. प्रविण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी कुटुंबीयांची आरोग्य तपासणी झाली.
त्यांना मोफत औषधोपचार देखील उपलब्ध करुन देण्यात आले होते. आरोग्य तपासणीसाठी जेऊर वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले, डॉ. पालवे, डॉ. हंबारडे यांनी सहकार्य केले. फादर जॉर्ज म्हणाले, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र माणुसकीच्या भावनेने गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य करीत आहे.
सर्वसामान्य, गरजू घटकांना मदतीचा हात दिला जात असून, दुर्बल घटकातील महिलांना प्रवाहात आनण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे कार्य संस्था करीत आहे. कोरोना काळात अनेक परप्रांतीय कामगारांना घरी पाठविण्यासाठी कार्य करण्यात आले.
निशुल्क कोविड सेंटर चालवून अनेक कोरोना रुग्णांना बरे करण्यात आले. पिंपळगाव माळवी परिसरातील आदिवासी बांधवांच्या पालाशेजारी पूरासारखी स्थिती निर्माण झाली. त्यांना मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल बाळासाहेब पवार, गंगाधर माळी यांनी बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे आभार मानले.