अहमदनगर - काही दिवसांपूर्वीच पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे एटीएम मशिन फोडल्याचा प्रकार घडल्यानंतर आता राहाता तालुक्यातील लोणी येथे एक प्रकार आज पुन्हा घडला आहे. चोरट्यांनी यावेळी चक्क जिलेटिनच्या कांड्याचा स्फोट करुन एटीएम मशीन फोडले. अन् लाखोंची रोकड लांवबली.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिस यंत्रणाही हादरली आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर वचक पुन्हा प्रस्तापित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चोरट्यांनी अक्षरश: वेब सिरिज किंवा सिनेस्टाईल पद्धतीने हा प्रकार केला.
वेताळबाबा चौकात टाटा प्रॉडक्ट इंडिकॅश कंपनीचे एटीएम आहे. रविवारी ( दि. 10 ) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवला. हे एटीएम फोडून त्यातील रोकड लंपास केली. चोरट्यांनी आधी एटीएमशेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या.
चोरट्यांची ही पद्धत पाहून पोलिसही अचंबित झाले आहेत. कारण सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारला. स्फोटाच्या आवाजाने नागरिकांनी घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र कड्या बाहेरुन लावलेल्या असल्याने चोरट्यांना लुटीसाठी वेळ मिळाला. ठसे तज्ज्ञ व डॉग स्कॉडच्या सहाय्याने तपास सुरू केला आहे.