'आधार' ही जगातली सर्वात मोठी बायोमेट्रिक व्यक्तिपरिचय योजना आहे. नुकतीच या योजनेला अकरा वर्षे पूर्ण झाली. भारतातील महाराष्ट्रात राज्यात दिनांक 29 सप्टेंबर 2010 ला आधार योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकाचे वितरण महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावातील रंजना सोनावणे या महिलेला करण्यात आले.
देशातील पहिले आधार गाव म्हणून या गावाची ओळख निर्माण झाली आहे. आधार क्रमांक योजनेला सुरुवात होऊन अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. नियोजन मंडळातर्फे जानेवारी 2009 मध्ये युनिक आयडेंटीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया या प्राधिकरणाची स्थापना झाली. तत्कालीन चेअरमन नंदन निलकेणी हे होते.
या योजनेअंतर्गत भारतातील १३० कोटींवर लोकांचे आधार क्रमांक तयार करण्यात आले आहेत.आधारअंतर्गत भारतातील व्यक्तींना त्यांनी पुरविलेल्या बायोमेट्रिक आणि अन्य तपशीलाच्या अद्वितीयतेच्या आधारावर एक १२ अंकी क्रमांक दिला जातो.
भारतीय रहिवाशांसाठी असलेल्या या योजनेचे नियंत्रण केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आधिपत्याखालील युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) या प्राधिकरणामार्फत केले जाते. आधार कायदा २०१६ अनुसार या योजनेला वैधानिक पाठबळ प्राप्त आहे.
– प्रवीण भुरके