पुणे - देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे पीवायसी जिमखाना येथे आयोजित पुरस्कारार्थी खेळाडूंच्या गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, अभिमन्यू पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर, सचिव गोविंद शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रीरंग इनामदार, सारिका काळे, खो-खो खेळाचे मार्गदर्शक डॉ चंद्रजित जाधव, विश्वस्त अरूण देशमुख, वैशाली लोंढे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, प्रत्येकाने एकतरी खेळ खेळलाच पाहिजे. खेळ तरुणांना जिंकण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह आणि ऊर्जा देतो. शरिराची व मनाची जडण-घडण खेळांच्या माध्यमातून होत असते. आयुष्यात खेळांमुळे नेतृत्वंगुणांना वाव मिळतो. टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल समोर बसणाऱ्या आजच्या युवा पिढीने मैदानी खेळाकडे वळण्याची आवश्यकता आहे.
सांघिक आणि वैयक्तिक खेळात राज्यातल्या अनेक खेळाडूंनी आपली चमक दाखविली आहे. यामध्ये खो-खोच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाने सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
सारिका इतर खेळाडूंसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी
खो-खो खेळातल्या कामगिरीसाठी देशातील मानाचा अर्जून पुरस्कार मिळवणारी खेळाडू सारिका काळे आणि तिला प्रशिक्षण देणारे चंद्रजित जाधव यांचा राज्याला अभिमान आहे. सारिका काळे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत, अनेक संकटांवर, आव्हानांवर मात करुन इथपर्यंतची वाटचाल केली आणि मोठे यश मिळवले. त्यांची वाटचाल ही इतर खेळाडूंसाठी मार्गदर्शक तसेच प्रेरणादायी असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.