'गणपती बाप्पा' म्हटलं की आपोआपच तोंडातून 'मोरया' हा शब्द बाहेर पडतो. श्रीगणेशाचं आणि आपलं नातं तितकं उत्स्फूर्त आणि जिव्हाळ्याचं आहे. म्हणूनच तो लहान थोरांचा 'माझा बाप्पा' असतो. या बाप्पाबद्दल प्रत्येकाच्या मनात संमिश्र भावना असतात.
(Video)
असं म्हणतात की गणपती दहा दिवस पृथ्वीवर असतो, त्यानंतर तो त्याच्या गावी जातो. मग तो जेव्हा पृथ्वीवर येणार असतो तेव्हा सगळीकडे जंगी तयारी सुरू असते. त्याला वाजत गाजत आणण्याची.
तोही वरतून पाहत असेल तर त्याला पण लवकरात लवकर पृथ्वीवर येण्याचा मोह आवरत नसेल.. मग एकदाचे येतात गणपती बाप्पा. त्यांच्या कौतुकासाठी दहा दिवस आरत्या, पूजा-पाठ, अभिषेक केले जातात. काही जण गणरायाला साकडे घालतात, की आमचे हे काम झाले तर तुला हे करू, ते करू...
सगळीकडे जल्लोष.... गणपतीला नैवेद्य दाखवतात. मग शेवटचा दहावा दिवस उजाडतो. तो म्हणजे बाप्पाला निरोप देण्याचा. त्याच्या गावी परत जाण्याचा तो दिवस. त्याही दिवशी सकाळी आरत्या, अभिषेक होतात आणि त्यांची थाटात मिरवणूक काढतात.
बाप्पा याच भ्रमात की आपण आपल्या गावी परत जातोय. त्याला याची कल्पना सुद्धा नसते की आपण पृथ्वीवर आहोत जिथून आपण दुसऱ्याच गावी जाणार आहोत.. अंह, पाठवले जाणार आहोत. त्यांचे ते गाव विहिरी, ओढ्या, नाल्यामध्ये सामावलेले आहे.
तो ओरडुन सगळ्यांना म्हणतो की, "अरे, हे माझे गाव नाहीये. हे तर नाले, विहिरी, ओढे, तलाव आहेत." पण त्या मिरवणुकीच्या, ढोलताश्याच्या गजरात त्याचा तो आवाज लोकांपर्यंत पोहचत नाही.
तो गणपती ओरडुन लोकांना बोलतो की शेवटी जर माझा असा पाहुणचार करणार असाल तर गरज नाही असले उत्सव करायचे. माझ्या नावाखाली वाईट धंदे करायचे. पण देवा तुझ कोण ऐकतेय रे, तुझी गरज संपली आता. फक्त दहा दिवस तू हवा होता.
आता तुझ इथे काय काम ? अरे एखाद्या ठिकाणी एखाद्या मूर्तीची विटंबना झाली तर त्या व्यक्तीवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जातात. आणि इथे तुझ्या विसर्जनाच्या दिवशी त्याच पोलिसांच्या कडक बंदोबस्तात तुझ्या मूर्तीची विटंबना केली जाते. त्याला सगळे विसर्जन म्हणतात. हा तर अजबच प्रकार आहे !
देवा तुला एकच बोलू इच्छिते, तू तर तुझ्या नामस्मरणासाठी या पृथ्वीची निर्मिती केली. पण हे लोकांनी तुझ्या नावावरून इथे धंदे सुरू केले आहेत. अशा प्रवृत्तींना तूच आवर घालू शकतो.
तुलाही पूर्ण अधिकार आहे, की तू देखील अशा कु-प्रवृत्तीच्या लोकांचे विसर्जन करावे. बाकी तू बघुन घे बाप्पा..
- पुजा सोळंके - पठाडे (अहमदनगर)