नाशिक : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले व देशाचे नाव कोरणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) अवघ्या काही वेळात करोडपती झाला आहे. तीन तासांमध्येच नीरजला वेगवेगळ्या संस्थांनी एकूण 13 कोटी 75 लाख रुपये दिले आहेत. देशभरातून विविध राज्ये, संघटना, कंपन्या यांच्याकडून नीरजवर बक्षिसांचा वर्षाव होत असताना केंद्र सरकार कडून मात्र अद्याप कुठल्याही बक्षिसाची घोषणा केल्याचे समोर आलेले नाही.
नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) ऐतिहासिक कामगिरी करत भारताला स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक (Gold medal) मिळवून दिले. ऑलिम्पिक इतिहासात भारताला दुसऱ्यादा वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले आहे.गोल्डन कामगिरीनीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.
'नीरज चोप्राला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास-1 नोकरी दिली जाईल. तसंच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही नीरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करू. तसंच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,' अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी केली आहे.
बीसीसीआय (BCCI) नीरज चोप्राला 1 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. याशिवाय सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्यांना प्रत्येकी 50-50 लाख रुपये आणि ब्रॉन्झ मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 25-25 लाख रुपये मिळतील. भारताच्या पुरुष हॉकी टीमने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलं, त्यांना बीसीसीआय 1.25 कोटी रुपये मिळणार आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amrinder Singh) यांनी नीरज चोप्राला 2 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे, याशिवाय नीरजला मणीपूर सरकार (Manipur Government) 1 कोटी रुपये, रेल्वेकडून 3 कोटी रुपये मिळणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOC) नीरजला 75 लाख रुपये देणार आहे. आयपीएलमधली चेन्नई सुपरकिंग्स टीमने (CSK) नीरजला 1 कोटी रुपये जाहीर केले आहेत. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नीरज चोप्राला त्यांची आगामी XUV 700 भेट द्यायचं ठरवलं आहे.
एवढी मदत मिळणार
हरियाणा सरकार- 6 कोटी रुपये
पंजाब सरकार- 2 कोटी रुपये
मणीपूर सरकार- 1 कोटी रुपये
रेल्वे- 3 कोटी रुपये
भारतीय ऑलिम्पिक संघटना- 75 लाख रुपये
चेन्नई सुपरकिंग्स- 1 कोटी रुपये
महिंद्रा ऍण्ड महिंद्रा- XUV 700