मोठी बातमी ! ९ लाखांची लाच मागणारी 'ती' महिला शिक्षणाधिकारी जाळ्यात

नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वैशाली वीर या लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. नऊ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मंगळवारी वैशाली वीर यांच्यासह त्यांचे कारचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते या तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या तिघा जणांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार काम करत असलेल्या शिक्षण संस्थेच्या चार शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. या मंजूर अनुदानाप्रमाणे शाळेतील ३२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची पदनिश्चिती करून त्यांचे नोव्हेंबर २०२० पासून थकीत वेतन काढून देण्यासाठी तसेच मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे वेतन पुढे नियमित सुरू ठेवण्यासाठी लाच मागितली होती. 

शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्या वतीने शिक्षक पंकज दशपुते यांनी तक्रारदाराकडे ९ लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत एसीबीने केलेल्या पडताळणीमध्ये शिक्षणाधिकारी यांनी तडजोडीअंती आठ लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. तसेच पुढील व्यवहार त्यांचे चालक येवले यांच्याशी करण्याविषयी सांगितले. 

त्यानुसार मंगळवारी एसीबीने शिक्षणाधिकारी यांच्यावतीने तक्रारदाराकडून आठ लाखांची लाच स्वीकारताना येवले याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर वैशाली वीर आणि पंकज दशपुते यांनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे.

दरम्यान,  ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार आली होती. त्यानंतर ठाणे एसीबीने नाशिकच्या पथकाच्या मदतीने ही कारवाई केली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !