कोल्हापूर - निसर्गाने पुन्हा रौद्र रूप धारण केलं आणि आपल्या कोल्हापूर, सांगली आणि कोकणाला अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला. सद्यस्थितीत बहुतांश पूर, अतिवृष्टीग्रस्त स्थलांतरित आणि वंचित ग्रामीण नागरिकांना अन्न धान्य, किराणा इ. साहित्य ठेवायला जागाही शिल्लक नाही. पण, युवानची टीम येथे मदतीला पोचली आहे.
त्यामुळे त्यांच्या तयार भोजनाची तातडीची गरज लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्यातील हेरवाड गावातील माळभागातील संतू मंदिर येथे पूरओसरेपर्यंत आज संध्याकाळपासून सामुदायिक 'सेवा किचन' युवान मार्फत सुरु करण्यात आले आहे.
युवानमुळे २०० पूरग्रस्तांना आज पोटभर जेवण मिळाले, अशी माहिती युवानचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी दिली आहे. त्यासाठी आवश्यक साहित्याची टिम युवान मार्फत पूरग्रस्त भागाजवळील किराणा व अन्न धान्य दुकानातून तातडीने खरेदी करण्यात आली. हा भाग पुराच्या पाण्याने तीनही बाजूने वेढलेला आहे.
टिम युवानने यापूर्वी २०१६ साली चेन्नई, २०१८ साली केरळ, २०१९ साली कोल्हापूर- सांगलीला आलेल्या महापूरावेळी वंचितांसाठी दीर्घकालीन सेवा कार्य ( मदत नाही ) राबविले आहे. त्यामुळे अनुभवाआधारे ठराविक ठिकाणी येणारा मदतीचा महापूर टाळून गरजू आणि वंचितांसाठी तत्काळ अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन सेवा कार्य करण्याचा टिम युवानचा नेहमीच प्रयत्न असतो.
चिपळूण, महाड, सांगली या ठिकाणीही स्थानिक स्वयंसेवक, संस्था आणि शासकीय यंत्रणा यांच्याशी योग्य समन्वय साधत उद्यापासून मदत वाटपाचे नियोजन टिम युवान करत आहे. या कार्यात सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन युवानच्या वतीने करण्यात आले आहे.