नाते असावे मेजवानी सारखे !

नात असंही असावं..!

नातं कसं असावं हे फक्त माणसांकडूनच शिकावं ! हे वावगं खरं. पण नातं माणसापेक्षा पशुपक्षाकडून शिकावं. एवढंच काय तर नात्यात गोडवा निर्माण करणाऱ्या बऱ्याच जोड्या येतात. पण.. थोडं आगळ-वेगळं, थोडं हटके-खटके, थोडं खट्टा-मिठ्ठा, थोडं नमकीन अशा नात्यांच्या जोड्या शब्दमय करून शब्दात गुंडाळल्या गेल्या आहेत. 


असच आगळ-वेगळं नातं, नि त्याला चवीची जोड, अशी आपली जीभ. ताटातल्या पदार्थाना तोंडात रेंगाळताच चव सांगणारी ती जीभ. आ..ह..हा. काय मस्त झालाय हा पदार्थ. ताट समोर दिसताच त्यात असलेले खमंग पदार्थाची चव जेंव्हा जिभेला तृप्त करते, तसेच असावे एखादे नाते. मनाला तृप्त करणारे.

नातं म्हटलं की, सहवास आला, आपलेपणा आला. माणसामाणसांतलं नातं शब्दात सांगता येतं, जाणवता येतं, अनुभवता येतं. पण तेच ताटातल्या पदार्थाच्या नात्याची त्यांच्या सहजीवनाची ती कल्पनाच करावी लागते. तशाच काही पदार्थांच्या जोड्यांच्या कल्पना करून त्यांना शब्द्दबद्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

पदार्थांनाही सहजीवन असावे, नात्याची वीण असावी. तेही एकमेकांत गुंतले जावे. पदार्थांच्या जोड्याही त्याचं नातं त्यांच्या चवेने चवदार बनवतात. कधी आंबट-गोड, कधी पाकातले गोडं, कधी खुशखुशीत, तर कधी तिखट, त्यांच्यातील आपलेपणाच त्यांना खमंग बनवतो.

लग्नाच्या पंगतीत जेंव्हा ताट समोर येत, तेंव्हा मनाला भावते ती ताटातली वांग्या-बटाटयाची भाजी! वाहवा... जीभेची ती सुरेख अशी मैत्रीणच म्हणावी लागेल. त्यानंतर दिसणारी ताटातली जोडी म्हणजे श्रीखंड-पुरी. आहाहा ! नुसतं नाव जरी उच्चारलं तरी तोंडाला पाणी आणणारी ही जोडी. 

पुरीतील तेलकटपणा नि तिच्यातील कमीपणा दूर करतो तो श्रीखंडच. टम फुगलेल्या गोबऱ्या-गालाच्या पुरीवर जेव्हा गोरापान श्रीखंड चढतो तेव्हाच तिला शोभा येते, नाय का? तसं पुरीसोबत भाजीही खमंग ठरते. पण खरी शोभा ती, तिला श्रीखंडाचीच.पुरीचे लाड पुरवणारे हे दोघे मित्र कुठेच सापडणार नाहीत, हेही तितकच खरं.

सुंदर सुंदर पुरीनंतर ताटात शोभून दिसणारा मसालेभात जरा तिखटच. पण त्याचा तिखटपणा बाजूला सारून त्याच्यात मिसळेल लोणचं, याची चव कुछ औरच. एखाद्याचा तिखटपणा कसा स्वत:त रुजवून टाकावा याच हे गोड नि सुरेख उदाहरण... डाळ-भाताची जोडी तर सर्वांच्या आवडीचीच.

 पांढऱ्या शुभ्र बेचव भातावर जेव्हा डाळ (वरण) स्व:ताला त्याच्यात विलीन करते, तेव्हा जिभेवर जणू स्वर्गच उतरला जातो. मोहक तिची फोडणी, काय ती तिची अदा. आहाहा!

ताटातील ती पुरणपोळी वाह! तिच्यासोबत असलेला तिचा मित्र परिवार काय संगत, काय ती मैफिल रंगते हे सांगणं म्हणजे जणू इंद्रदरबारी नाचे सुंदरा.... कुरडई, पापडी, भजी, त्यातच पुरणपोळीची चव वाढवणारा तिचा जोडीदार म्हणजे तिच्या गोडपणाला साथ देत तोंडात लहर उठवणारा तो सारा जणू आनंदाचे बीज घेऊन येतात हे ताटात. 

त्याचसोबत त्यांच्या मैफिलीला अजून शानदार बनवणारा राजांचा राजा रस म्हणजेच आमरस. जणू उतावळा नवरा नि गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच असतो तो ताटात. पुरणपोळीवर प्रेम करणारा हा आमरस म्हणजे देवगड, पायरी, हापूस सारख्या श्रीमंत घरांदाजीतील...

खमंग असा समजला जाणारा ढोकळा त्याला साजेशी अशी आंबट-गोड तिखट चटणी वाह! रे ! कानामागून आली नि गोड होऊन गेली ती जलवाल्लिका म्हणजेच जिलेबी. कढईतील तेलात वेटोळे घालून बसलेली जिलेबी जेव्हा गोड साखरेच्या पाकात समलीन होते तेव्हा तिची अदा ती पाहण्यासारखीच..

तिचं नटणं-मुरडणं पाकामध्ये गेल्यावर कस अलंकारित होऊन जात. बटाटा वडा त्याची ती प्रेयसी पाव जस जन्मोजन्मीचं नातं सांगून जातात. झणझणीत तिखट वड्याला जेव्हा पावाची साथ लाभते तेव्हा त्याची मोहक अदा जिभेवर विरून जाते. नास्त्यातील उपम्याला तर उपमाच नाही. 

पोह्यांची तर तोडच नाही. इडली, सांबर, डोसा, चटणी यांच्यासारखे सुखात नांदणारे घराणे नाही. मॅगीपास्ता तर खूपच भांडखोर पण एकत्रित सहवास मात्र टाकत नाहीत. सुखाने नांदत त्यातच चवीचे उखाणे घेऊन येतो तो थालपीठ, नुसत पिठात मिसळून भाज्या कशा समलीन होऊन जातात. आहाहा ! 

ऐटीत, रुबाबात डोक्यावर तुरा घेऊन गाजर कसा देखणा त्याला मिळावी ती दुधाची साथ. यांची मैत्रीची तर तुलनाच होऊ शकत नाही. दुध-गाजर एकत्र येऊन पंगतीतली शान वाढवून जिभेला मोहक अदानी खुश करणारी हि जोडी म्हणजे हलवा. 

वाटीत येऊन शान वाढवून घेणारा हा गाजराचा हलवा नि त्यावर दृष्ट लागू नये म्हणून टाकलेला बेदाण्याचा कुट वाह ! नात्यांची ही अदा घेऊन सहजीवन चवदार करणारे हे पदार्थ वाह! वा! असेच सहजीवनाचे सूत्र माणसांत आले तर सुखी जीवनाचा मंत्रच गवसल्यासारखा होईल, नाय का? 

म्हणूनच अलंकाराने भरलेले, सुखात दु:खात भिजलेले, आंबट-गोडव्यात न्याहाळलेले नाते असावे मेजवानी सारखे..

- दिपाली साबळे धांडे
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !