रविवारी भरणार आभासी पद्धतीने राष्ट्रीय लोकअदालत

अहमदनगर - जिल्हा न्यायालय आणि जिल्हा मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये येत्या रविवारी (दिनांक १ ऑगस्ट,२०२१) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 


कोरोना नियमावलीचे पालन करून अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होऊन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांनी केले आहे. 

ही लोकअदालत आभासी पध्दतीनेही आयोजित केलेली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे सुचेननुसार आयोजित या राष्ट्रीय लोकदालतीत दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवली जातील. 

बरीच प्रकरणे आभासी पध्दतीने हाताळण्यात येतील, तसेच प्रत्यक्ष उपस्थित होणा-या लोकअदालतमध्ये देखील ब-याच पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. 

पक्षकारांनी परस्पर आपसी समझोता करून ती सामंजस्याने सोडवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे.

मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट, बँकेची कर्ज वसुली, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई, कामगार कायदयाखालील प्रकरणे, कामगार कायदयाखालील प्रकरणे, कौटुंबीक वाद, इलेक्ट्रीसीटी अॅक्टची समजोता प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरीकांना आपली प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !