अहमदनगर - जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांची 'क्रेझ' कमी होऊ लागली आहे. तब्बल ९३६ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात विद्यार्थी प्रवेश घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा सभापती प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. इयत्ता पहिलीचे दाखलपात्र विद्यार्थी शंभर टक्के दाखल करून घ्यावे, पालकांचे याबाबत प्रबोधन करून इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात प्रवेश कसे होतील, याबाबत प्रबोधन करावे, असे त्यांनी सांगितले.
यावर्षी कोविडमध्ये ज्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी प्राण गमावले. जे अनाथ झाले त्यांच्याबाबत संवेदना व्यक्त केली. त्यांच्या घरी भेटी देऊन सांत्वन करावे. शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र होतील. या दृष्टीने तालुक्यातील पदवीधर शिक्षकांना उद्दिष्ट निश्चित करून द्यावे, असेही शेळके म्हणाले.
या सभेला जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, उज्ज्वला ठुबे, विमल आगवण, प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ आदी उपस्थित होते. पदवीधर शिक्षकांना उद्दिष्ट निश्चित करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.