अहमदनगर - शहरात रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे, त्याचबरोबर डीपी रस्त्यांच्या कामांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने मनपावर आसूड मोर्चा काढत मनपाला जाब विचारला.
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पोतराजांसह किरण काळे यांनी मनपावर आसूड उगारत मोर्चाचे नेतृत्व केले.
टॉप अप पेट्रोल पंपापासून सुरू झालेला मोर्चा महानगरपालिकेवर धडकला. त्यावेळी महानगरपालिकेचा आवार आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेला होता. आंदोलकांच्या हातांमध्ये पालिकेच्या निषेधाचे फलक होते.
किरण काळे म्हणाले, महानगरपालिकेने गाढ झोपेचे सोंग घेतले आहे. मनपातील सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी दररोज शहरातील रस्त्यांवरून जा-ये करत असतात. त्यांना रस्त्यांवर पडलेले खड्डे दिसत नाहीत का ?
नागरिकांकडून कर संकलन करण्यासाठी मनपाकडून दारामध्ये वाजंत्री पाठविली जाते. खड्डेमुक्त शहराच्या हक्कासाठी आम्ही पोतराज आणि वाजंत्री घेऊन महापालिकेच्या दारात महापालिकेला झोपेतून उठवण्यासाठी आलो आहोत.
काळे यांनी मनपा सत्ताधाऱ्यांची नावे न घेता सडकून टीका केली. भाजप, राष्ट्रवादीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात मध्ये शहराची वाट लागली. व्हिजन नसलेले आमदार असल्यामुळेच शहराची दुरावस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला.
ठराविक ठिकाणी वारंवार खड्डे पडतात. ते खड्डे वारंवार बुजवले जातात. असे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना महानगरपालिका काळ्या यादीत का टाकत नाही ? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला.
मनपाचे आयुक्त शंकर गोरे यांनी काँग्रेसची निवेदन बाहेर येऊन स्वीकारले. काँग्रेसचे तीन एकर आलेला मागण्यांवर ती लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक सोळंके यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. पोलिसी सभ्यतेच्या पलीकडे जाऊन त्यांनी पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून गुंदेचा यांनी केला आहे.