महसुलातील 'नगरी' बकासूरांचा 'वेध' कधी ?

'लाचखोरी' हाच महसूल प्रशासनाचा खरा भेसूर चेहरा आहे हे वारंवार सिद्ध होत आहे. यात 'महिला अधिकारी' देखील मागे नाहीत. याचा प्रत्यय काल पुन्हा आला. राज्याच्या महसूल प्रशासनातील मनिषा राशिनकर नामक उस्मानाबाद येथील उपविभागीय अधिकारी आहेत. लाच घेताना काल त्यांना अटक झाली. अहमदनगर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून पूर्वी त्या कार्यरत होत्या. 

लाच घेताना महिला अधिकारी लाचलूचपतच्या जाळ्यात अडकल्याची ही पहिलीच घटना नाही... म्हसुलात असे अनेक बकासूर होऊन गेलेत आणि आहेत. माफियांची वाळू तस्करी, अधिकाऱ्यांची हफ्तेखोरी अहमदनगर जिल्ह्यात देखील राजरोस सुरू आहे. कायदेशीर कारवाईच्या कमानीतून महसुलातील या हफ्तेखोर बकासुरांचा 'वेध' घेण्याची गरज आहे.


वाळू तस्करीत 'हात ओले' करणारे राज्यात अनेक अधिकारी आहेत. पदाचा गैरवापर करून केवळ खोऱ्याने पैसा ओढायचा हाच एक कलमी कार्यक्रम ही मंडळी नोकरीत राबवतात. बाकी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे यांना काहीही देणेघेणे नाही. 

अडचणी सोडविण्यासाठी लोक यांच्या कार्यालयात चकरा मारून अक्षरशः आपले तळवे घासून घेतात. मात्र याची यांना तमा न फिकीर. वाळू तस्कर, लँड माफिया, दोन नंबर धंदेवाईक यांच्याच गराड्यात अधिकारी मंडळी असते. मग सर्वसामान्यांची कैफियत ऐकण्यास यांना वेळ कसा मिळेल.


सर्वसामान्य जनता यांच्या कार्यालयाबाहेर दिवसभर वाट पाहून पाहून वैतागून निघून जाते. कामासबंधी अर्ज, तक्रार अर्ज यांच्या दप्तरी दिले तरी त्यांना केराची टोपली दाखवली जाते. बहुधा असाच अनुभव सर्वांना येतो. मात्र 'टक्केवारी'ची कामे असल्यास त्यासाठी तासंतास बसून 'मिटींग' चालतात. 

हे अधिकारी फक्त टक्केवारी घेण्यातच धन्यता मानतात आणि लाखो, करोडोंची माया जमवतात. बेकायदेशीर वाळू उपसा करणारे माफिया अधिकाऱ्यांना दरमहा जो नियमित हप्ता देतात तो लाखात असतो. असे अनेक असतात. त्यामुळे या हप्त्याचा आकडा सर्वसामान्यांना कळण्याच्या पलीकडचा असतो.

लाच घेऊन प्रशासकीय पदाचा किंबहुना स्वतःचाही जाहीर लिलाव करून आपलं तोंड काळे करणारे हे अधिकारी उलट समाजात उजळमाथ्याने फिरतात. समाजात यांच्या हफ्तेखोरीची रंगतदार चर्चा केली जाते, हे विशेष. हा अधिकारी एवढा हफ्ता घेतो, तो तेवढा घेतो. 

अमुक अधिकारी तर दोन नंबर ने एवढे कमावतो. अशी चर्चा करून या हफ्तेखोरीस दिली जाणारी समाजमान्यता घातक आहे. ती पहिली थांबवली पाहिजे. कारण, अपप्रवृत्तीना पाठीशी घातल्याने समाजाची मोठी हानी होत असते.

खरेतर लाच घेताना शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी रंगेहात सापडल्यास खरेतर  त्यास तात्काळ सेवेतून बडतर्फ करायला हवे. तसेच फौजदारी गुन्हा नोंदवून कठोर शिक्षेची तरतूद करायला हवी. जेणेकरून लाचखोरांचे उर्वरित आयुष्य काळकोठडीत जायला हवे.

- नगरी सातारकर

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !