सहा जून सोळाशे चौ-याहत्तरला अभिषेकाचा दिन ठरला...
आवताण धाडिले सा-या मुलखाला..!!!
देवदेवतांचा गोंधळ मांडला..
गजानना, या राजांच्या अभिषेकाला,
तुळजापूर भवानी आई या
विठूमाऊली तुम्ही जोडप्यानं या
करवीर अंबाबाई आशिष देण्या या
हिमालया,सा-या जलदेवतांनो
अभिषेक घालण्या या.. !!
बत्तीस मण सोन्याचे सिंहासन
चौथा-यावरी सिंह दोन
होई तेव्हा सिंहासनावरुनी सुर्यदर्शन...!!
सजली अंबारी, झुलते आब्दागिरी
सभामंडपी चोख झाली तयारी
कलश चांदीचे छत्र होते सोनेरी ...!!
बोलले गागाभाट्ट,
झाला नाही आपणासारखा वीर अनेक शतकात..
शत्रूला गारद करण्या आहे ही शक्ती मर्द मराठ्यात....!!!
शिवरायांचे अंतकरण आले भरुन
किती जिवलग गेले सोडूनी दूरवर..
तानाजी, सुर्याजी, बाची, मुरार, गेले कुठे
बाजी पासलकर... नांवे किती घ्यावी,
आहुती देऊनी गेले शिलेदार...!!
जिजाऊंचेही मन आले भरुन
पराक्रमी हि-यांचे बलिदान
हे हिरे म्हणून जिजाऊंनी पाहिला आजचा दिन...
साकारले स्वराज्याचे स्वप्नं....!!!
जेष्ठ शुध्द त्रयोदशी शनिवार उजाडला,
दख्खनचा अभिमान सिंहासनी बैसला
महाराणी सोयराबाई डाव्या बाजूला,
युवराज संभाजीराजें बसले उजव्या अंगाला..
गागाभट्टांनी मंत्रोच्चार केला
प्रजेने जयजयकार बोलला...!!
गागाभट्टांनी शिवरायांच्यामध्ये माथी
ठेविली मोत्याची झालर,
शिवछत्रपतीं असा केला आदरे केला उच्चार,
जिजाऊं अन् रयतेच्या आनंदाला नाही
पारावर...!!!
सोळा सुवासिनीं करती औक्षण
छत्रपतींचे,
ब्रिटिश आला राणीचे मानपत्र घेऊन
उभा राहिला छत्रपतीं समोर मान
झुकवून
छत्रपतींनी पुजिले धनुष्यबाण, तलवार..
वंदन करती जिजाऊंना,
धरली मातेने आशिषाची धार...!!!
मंगलवाद्य वाजली, सनई वाजते सुरात,
ताशा तडतडे जोरात,
ढोल वाजे, वाजे तुतारी चौघडा,
रणवाद्य वाजती, झडती नौबती मागून...!!!
सह्याद्री गेला अभिमानाने आनंदून
गेल्या देवगिरीच्या जखमा आज धुऊन
भाग्याचा महाराष्ट्राचा आज दिन
करते स्वप्नजा छत्रपतींना विनम्र वंदन
चार शब्द घ्यावे गोड मानून...!!!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)