अहमदनगर (MBP LIVE 24) :
शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन कर्मचार्यांवर वाळू व्यावसायिकाकडे 15 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या तीन कर्मचार्यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने नामंजूर केला असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी दिली.वाळू वाहतुकीसाठी मागितली लाच
वाळूची वाहतूक करणारे एक वाहन उपअधीक्षक मुंढे यांच्या पथकातील वसंत कान्हु फुलमाळी, संदीप वसंत चव्हाण व कैलास नारायण पवार (रा. पाथर्डी) यांच्या पथकाने पकडले होते. हे वाहन कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी या कर्मचार्यांनी वाळू व्यावसायिकाकडे 15 हजार रूपयांची मागणी केली होती. एप्रिल महिन्यामध्ये हा प्रकार घडला होता.लाचलुचपतकडे तक्रार
याबाबत त्या व्यावसायिकाने नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाच मागितली जात असल्याची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यातून तक्रारीत तथ्य आढळून आले. लाच मागणीचा पुरावा एसीबीच्या अधिकार्यांना मिळाला. त्यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
निलंबनाची कारवाई
लाच मागितल्या प्रकरणी 3 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पोलीस पसार झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तिघेही फरार : पसार असलेल्या पोलिसांनी अटकपूर्वसाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावली झाली. यावेळी लाचलुचपत विभागाचे तपासी अधिकारी व सरकारी वकिलांनी आरोपींना अटकपूर्व जामीन न देण्यासाठी युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. दरम्यान लाचलुपत विभागाकडून त्या कर्मचार्यांचा शोध सुरू आहे.