'घंटा' वाजली ऑनलाईनच... शिक्षण सुरू ? शाळा बंदच !

नाशिक (MBP LIVE 24) :  

नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली खरी पण, या सत्रातही 'शिक्षण सुरू आणि शाळा बंद', अशीच अवस्था आहे.  कोरोना संकटामुळे यंदाही शाळांची घंटा ऑनलाइनच वाजली आहे. मात्र, यामुळे विद्यार्थी मात्र हिरमुसलेत...


15 जून हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक आगळा वेगळा दिवस. नव्हे सोहळाच तो. या दिवसाची तयारी घरात तब्बल पंधरा दिवस आधीच सुरू होते. पुस्तके, वह्या, स्टेशनरी, नवी बॅग, बूट, स्कुल युनिफॉर्म आदी   शालोपयोगी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा फुलून जातात. शाळेतही या दिवसाची जय्यत तयारी केली जाते.

उन्हाळ्याच्या सुटीनंतर चा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी मोठा औत्सुक्याचा असे. मात्र, गेल्या वर्षीपासून शाळेच्या पहिल्या दिवसाचा हा धमाल आनंद कोरोनाने हिरावून घेतलाय. गेल्या वर्षी म्हणजे 15 जून 2020 रोजी देखील शिक्षण सुरू, शाळा बंद अशीच परिस्थिती होती. कोरोना लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी या निर्बंधामुळे व विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करून शाळा बंदच होत्या. त्यामुळे पहिली ते बारावीच्या परीक्षाही रद्द करून सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णयही झाला. मागील वर्षी सततच्या ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी नंतर कंटाळले होते. त्या आता पुन्हा ऑनलाइन शिक्षणानेच शाळा सुरू होत आहेत.


इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळांमधील शिक्षकांची 50 टक्‍के, तर इयत्ता नववी ते बारावीच्या शाळांमधील शिक्षकांची 100 टक्‍के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. शाळांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात येणार असून, शाळांनी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.


नो ऑफलाईन, ओन्ली ऑनलाइन
शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी शाळांनी स्वच्छतेबाबतची कामे पूर्ण करत लाडक्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज केल्या. मात्र, शासनाने 'नो ऑफलाईन, ओन्ली ऑनलाइन',  असा पवित्रा घेतल्याने यंदाही शाळा ऑनलाईनच भरल्या. त्यासाठी शाळांनी शिक्षकांच्या ऑनलाइन, ऑफलाइन बैठका घेतल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी, पालकांच्या ऑनलाइन बैठका घेऊन विविध सूचना देण्यात आलेल्या आहेत. मोबाइल, लॅपटॉप, संगणक आदी साहित्य खरेदी व दुरुस्तीसाठी पालकांची धांदल उडू लागली आहे. प्रवेशोत्सव यंदाही प्रत्यक्षात साजरा न झाल्याने विद्यार्थी मात्र हिरमुसले आहेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !