सोशल मिडीयावर काही स्वयंघोषित नेते खऱ्या लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा अधिकारी यांच्यासोबत पोस्ट करतात. आणि त्यांच्या नावावर धमकी देतात. हा गंभीर प्रकार आहे. अनेकदा अशा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना याबाबत खुलासा द्यावा लागलेला आहे की अशा लोकांशी आपला काहीही संबंध नाही.
कारण जे फोटो पोस्ट करतात, ते चांगले असतातच असे नाही. अनेकदा समारंभ, सोहळे, कार्यक्रमात सेलिब्रिटी, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढले जातात. पण याचा वापर कशासाठी होणार आहे, हे त्या संबंधितांनाही माहित नसते. जेव्हा केव्हा त्यावरुन अडचणीत येतात, तेव्हा खुलासा करावा लागतो.
यात चूक त्यांची नसेलही. पण त्यांच्या समवेतच्या फोटोंचा गैरवापर करुन कोणी शासकीय अधिकारी, इतरांना ब्लॅकमेल करत असेल तर? हा गुन्हाच आहे. पण फोटोत दिसणाऱ्या मोठ्या व्यक्तीमत्वाशी पंगा नको, म्हणून अनेकदा कोणी तक्रार करायला पुढे येत नाही. ही त्यांची मजबुरीही असते.
पण, याचा गांभीर्याने विचार करण्याची पाळी आली आहे. कारण आता अशा प्रकरणात जर चूक नसताना त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे रहात असेल तर त्यांनाही खुलासा करावाच लागणार. यापेक्षा त्यांनी आधीच काळजी घेतलेली बरी ना? चुकीचा लोकांना जवळ फिरकू न देणे, हाच उत्तम उपाय.
- प्रतिभा मुंडे (मुंबई)