अहमदनगर - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबविण्यात येते. याअंतर्गत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने 120 लाभार्थी दाम्पत्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक सहाय दिले.
नुकतेच समाज कल्याण विभागच्या वतीने जिल्ह्यातील अशा जोडप्यांना या अनुदानाच्या धनादेशांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सीईओ राजेंद्र क्षीरसागर, सभापती उमेश परहर, काशिनाथ दाते, सुनिल गडाख उपस्थित होते.
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, बौध्द धर्मात धर्मांतर केलेल्या अनुसूचित जातींच्या व्यक्ती, विशेष मागासवर्ग यापैकी एका व्यक्तीने सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन व शीख या व्यक्तीशी विवाह केल्यास प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.
तसेच यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सदस्य संदेश कार्ले, हर्षदा काकडे, अजय फटांगरे, जालिंदर वाकचौरे, समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे, वासुदेव सोळंके, डॉ. संदीप सांगळे, परिक्षित यादव उपस्थित होते.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, बौध्द धर्मांतरीत अनुसूचित जातींच्या व्यक्ती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी दोन वेगवेगळ्या प्रवर्गातील व्यक्तींनी आंतरजातीय विवाह केला असल्यास त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
असा आंतरजातीय विवाह 1 फेब्रुवारी 2010 पूर्वी झाला असल्यास 15 हजार रुपये व दि.1 फेब्रुवारी 2010 नंतर झाला असल्यास 50 हजार रुपये इतके अर्थसहाय दिले जाते. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणार्या या योजनेसाठी मार्च 2021 अखेर 60 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार 120 लाभार्थींना प्रत्येकी 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.