'बेडूक' कसा नियम आणि कायद्यांना फाटा देऊन सर्वसामान्यांची फसवणूक करतोय, या त्याच्या फसव्या करामती आपण मागील अनेक 'गोष्टीं'मध्ये पाहिले. मात्र, बेडकाने स्वतःच आपण बोगस काम करत असल्याचे कोर्टापुढे शपथेवर सांगितल्याने त्याचे 'फसवेगिरी'चे पितळ कायदेशीर उघडे पडले आहे. दुसऱ्याची साक्ष द्यायला गेला आणि बेडूक स्वतःच कायद्याच्या कचाट्यात पुरते अडकले. . हा सर्व प्रकार कसा आणि कोठे घडला हे जाणून घेण्यासाठी आजची फसव्या बेडकाची गोष्ट जरूर वाचा....
'करायला गेला गणपती आणि झाला मारुती', अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. पापी बेडकासोबत देखील नेमके असेच काही तरी घडलंय... त्याची ही मजेशीर गोष्ट. त्याचे झाले असे, की एका अबला महिलेच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी बेडूक मोठ्या थाटात नुकतेच 'कोर्टा'त गेले. मात्र, येथे जे काही घडले त्याने बेडकाला दिवसा आकाशात तारे दिसले. ही खोटी साक्ष बेडकाला चांगलीच महागात पडली..
'शेववाडी'च्या पारावर पंच मंडळी बसली होती. निवाडा ऐकण्यासाठी गावकरीही मोठ्या संख्येने हजर होते. न्यायदेवता आसनस्थ झाली आणि निवाड्यास सुरुवात झाली. साक्ष देण्यासाठी आलेल्या बेडकापुढे 'धर्मबुक' आणले. त्यावर हात ठेवून बेडूक म्हणाले, देवा शप्पथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही ! (प्रत्यक्षात बेडूक सगळं खोटंच बोलला. ही बाब वेगळी)
पंच म्हणाले : या व्यक्तीला दवाई तुम्हीच दिली काय?
बेडूक : होय, साहेब.. (म्हणत, बेडकाने एक कागद न्यायदेवतेकडे दिला.)
न्यायदेवता : (कागद पहात बेडकाला विचारले) तु तर वैदू आहेस. मग ही 'इंग्रजी दवा' लिहिण्याचा तुला कायदेशीर अधिकार आहे काय?
बेडूक : (घाम पुसत गोधळलेल्या अवस्थेत) अ... ब... (आवंढा गिळत) अमक्या नियमानुसार तमक्या परवानगी नुसार...
न्यायदेवता : (बेडकाला थांबवत. दरडावून विचारले) ते नको सांगू, ते बाकी मला माहित आहे. फक्त एव्हढेच सांग, की अधिकार आहे की नाही?
बेडूक : (पूर्ण घाबरलेल्या अवस्थेत) नाही साहेब. पण, या व्यक्तीची शस्त्र- क्रिया झालीय. त्यामुळे त्याला ...... (बेडकाला थांबवत...)
न्यायदेवता : ती शस्त्र- क्रिया तुला करता येते का?
बेडूक : (पुन्हा घाम पुसत... घाबरत) नाही साहेब. पण...
न्यायदेवता : तुला लिहिण्याचा अधिकार नाही. शस्त्र- क्रिया चा अधिकार नाही. यामुळे तू बोगस असून अनेकांना फसवत आहेस. मग तू खोटी साक्ष देण्यासाठी इथे आलाच कसा? आधी या बेडकाला ताब्यात घ्या, अन्यथा हा आणखी अनेकांच्या जीवाशी खेळत राहील.
अशा पद्धतीने दुसऱ्या च्या बाजूने खोटी साक्ष देण्यासाठी गेलेल्या 'बोगस बेडूका'चे स्वतःचेच पितळ उघडे पडले. न्यायदेवतेने बेडकाच्या 'बोगसगिरी'चे चौकशी चे आदेश दिले आहेत. तसेच बोगस बेडकाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अधिकाऱ्यांचे आणि बेडकाचे नेमके काय आणि कसे 'आर्थिक हितसंबंध' आहेत याचीही चौकशी करून कारवाई करण्यास बजावले आहे.
क्रमशः ........
आजच्या गोष्टीची शिकवण :
1. कायद्यापुढे अतिशहाणपण चालत नाही !
2. खोट्याची संगत महागात पडते !
3. कितीही झाकले तरी खोटं कधी झाकत नाही. ते उघडं पडतंच !