अहमदनगर (MBP LIVE 24 टीम) :
कोरोनाकाळात डॉक्टरांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरूच आहेत. संगमनेरातदेखील एका डॉक्टरने रुग्णाकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारणी केल्याने त्यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि लेखा परीक्षकाविरोधात कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडून जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
संगमनेरमधील एका हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. तक्रारदार व्यक्तीने डॉक्टरसह तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे लेखाधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.
बिलात आढळल्या त्रुटी
२० मेपर्यंत संबंधित रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देतेवेळी रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांना तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचे बिल दिले. रुग्णास बायपॅप सुविधा अकरा दिवसांसाठी दिली असताना बिल २० दिवसांचे लावण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या बिलात अनेक त्रुटी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी शासकीय ऑडिटर यांच्याकडून बिलाची तपासणी करण्याविषयी संबंधितांना कळविले.
नातेवाईकांनी ऑडिटरशी संपर्क केल्यानंतर त्यांना रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करण्यास सांगण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने बिलात कोणतीही चूक नसल्याचे सांगितले.
एक लाखापेक्षा जास्त बिल, मग ऑडिट का नाही?
एक लाख रुपयांपेक्षा जास्त बिल असेल तर त्या बिलाचे शासकीय ऑडिटरमार्फत फ्री ऑडिट बंधनकारक आहे. अशा ऑडिट करण्याबाबतच्या सूचना तहसीलदारांनी केल्या नाहीत. त्यासोबतच शासकीय ऑडिटर यांनी देखील कर्तव्यात कसूर केली. या सर्व प्रकाराची माहिती गटविकास अधिकारी तथा भरारी पथकाचे प्रमुख यांना देण्यात आल्यानंतर त्यांनीदेखील गांभीर्यपूर्वक दखल घेतली नाही. म्हणून या सर्वांनी कर्तव्यात कसूर करत डॉक्टरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.