मुंबई - सर्जरीचे कोणतेही प्रशिक्षण अथवा तत्सम कोर्स न केलेल्या एमबीबीएस डॉक्टरने जवळपास एक हजार शस्त्रक्रिया केल्याचे उघडकीस आले. एका टॅक्सी ड्रायव्हरवर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यानंतर डॉक्टरचा हा प्रताप उघडकीस आला. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी डॉक्टर एस. मुकेश कोटा याला अटक केली आहे.
जाहिरात पाहून क्लिनिक गाठले
गोरेगाव येथे राहणाऱ्या एका टॅक्सीचालकाला मुळव्याधाचा त्रास होता. त्यावर उपचार करूनही गुण येत नव्हता. त्याला अन्य टॅक्सीचालकांनी दादर टी. टी. येथील गोपालराव पाईल्स सेंटरबाबत सांगितले. टॅक्सीचालकाने अधिक माहिती घेतली असता मुंबईत ठिकठिकाणी या क्लिनिकचे 'मूळव्याधीवर विनाशस्त्रक्रिया उपचार' असे फलक झळकत असल्याचे दिसून आले. २० फेब्रुवारी रोजी पत्नीसह क्लिनिक गाठले.
रक्तस्राव होऊन बेशुद्ध
यावेळी ड्रेसिंग करून डॉक्टर एस. मुकेश कोटा यांनी दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तसेच छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल, असेही सांगितले. काही मिनिटांत शस्त्रक्रिया केली आणि त्यापोटी २५ हजार रुपये घेतले. त्यानंतर पत्नीसोबत टॅक्सीने घरी जात असताना शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यात तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तातडीने केएमई रुग्णालयात दाखल केले. तो बरा होऊन बाहेर पडल्यानंतर त्याने माटुंगा पोलिसांत तक्रार दिली.
हजारावर शस्त्रक्रिया
तक्रारीत म्हटले आहे, की चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे वाहनही चालविण्यासाठी बसता येत नाही. त्यामुळे उदरनिर्वाह करता येत नाही. या तक्रारीनुसार आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून डॉ. कोटा याला अटक केली आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने जवळपास एक हजार शस्त्रक्रिया केल्याची माहिती दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
'एमबीबीएस'ला शस्त्रक्रियेची परवानगी नाही : डॉ. कोटा याच्या पदवीबाबत महाराष्ट्र वैद्यकीय परिषद तसेच जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पोलिसांनी कागदपत्रे पाठविली आहेत. त्यानुसार समिती गठित केली आहे. नियमानुसार मुळव्याधीवर एमबीबीएस पदवी धारण केलेला डॉक्टर शस्त्रक्रिया करू शकत नाही. त्यासाठी डॉक्टरने एम. एस. सर्जरी ही अतिरिक्त शैक्षणिक अहर्ता धारण करणे आवश्यक आहे.