वटपौर्णिमा - चला वटवृक्षरुपी नैसर्गिक 'व्हेण्टिंलेटर' जपुयात

आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा

भारतीय जीवनात सणसमारंंभामध्ये वटवृक्षाचे महत्व अनन्यसाधारण आहे. कुठल्याही मंदिराच्या परिसरात वटवृक्ष असतोच.पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यांचा उदात्त वारसा असलेल्या भारतात अलिकडे सणांना हिडिस स्वरुप आले आहे.

एका पुराणकथेत शंकर संसारात लक्ष देत नाहीत म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील, असा शाप दिला म्हणे. आणि तो वटवृक्ष झाला, महाप्रलय झाल्यावर सारी सृष्टी नष्ट झाली तरी सारे वटवृक्ष पृथ्वीवर पाय घट्ट रोवून उभे राहिले.

डार्विनच्या सिध्दांतानुसार होमो सेपियन माणसांपासून आजचा मानव उत्क्रांत होत गेला... तो होमो सेपियन मानव शिकारीसाठी वणवण भटकत होता. संरक्षणार्थ बायका मुलांना गुहेत ठेवून तो निघून गेला.. याला काही वर्षे उलटली. मेंदूत रासायनिक बदल होत गेले. भोवतालच्या परिसराची नव्याने ओळख झाली.. 

कुतूहलातून वनस्पतीची ओळख झाली. आदीम .स्त्रीला या वनस्पतींचे महत्त्व कळले. अजूनही आजीच्या बटव्यात वनौषधीचा समावेश असतो. इथेच आदीम स्त्रीने शेती करायला सुरुवात केली.... पुढे अनेक स्थित्यंतरे झाली आणि कृषी संस्कृती स्थिरावली. 

कृषक संस्कृतीचे सावित्री आणि सत्यवान हे प्रतिनिधी होते. रानावनात वाढल्याने सावित्रीला वनौषधीचे ज्ञान असावे. वटपौर्णिमा येते तो दिवस ज्येष्ठ महिन्यातील पोर्णिमा. पावसाचा आरंभीचा काळ. याच काळात शेतीच्या कामाला सुरुवात होते. या काळचे हवामान दमट आणि घुसमट वाढवणारे असते. 

अशा वातावरणात सत्यवान काम करत असण्याची शक्यता आहे. इथे तो दमतो आणि त्याची तब्येत बिघडते. जवळ सावित्री असते.. ती हे पाहते आणि पावले उचलते.. वडाच्या झाडाखाली त्याला आणते. सावली मिळाल्याने सत्यवान सावरतो. परिसरातील वनस्पतींच्या औषधी गुणांचा वापर करत सत्यवानाला ती पूर्ववत करते. 

आपण मौसमी पावसाच्या पट्ट्यात राहतो. वड, पिंपळ, चिंच, उंबर आदी झाडांची मुळे पाणी शोधतात. हे पाणी पायापर्यंत जाते. पानातील हरितद्रव्याच्या (Chlorophyll) आणि कार्बन डाय ऑक्साईड साहाय्याने सूर्य प्रकाशात प्रकाश संश्लेषण (Photosynthesis) या क्रिया होते. त्यातून Oxygen तयार होतो. 

पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड  प्रमाणात प्राणवायू सोडत असते.म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरुन काढतो.त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्याने तो जास्तीत जास्त कर्बवायू आणि इतरही विषारी वायू शोषून घेऊन हवा शुध्द ठेवतो.

वड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरुपात बाहेर फेकतो.त्याचा उपयोग ढग बनण्यासाठी आणि हवेत आर्द्रता व गारवा निर्माण करण्यासाठी होतो.पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेऊन पाऊस पाडण्यास मदत करणे हेदेखील वडाचे काम आहे. 

रामायण,महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिल्य अर्थशास्त्र, रघुवंश इतर अनेक संस्कृत ग्रंथातून भिन्न भिन्न संदर्भातून वटवृक्षाचा उल्लेख आढळतो. बौद्ध धर्मीयही या वृक्षाला पवित्र मानतात. त्यांच्या सात बोधीवृक्षापैकी हा एक आहे. वटाची प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुध्दा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून याला अक्षयवटवृक्ष म्हणतात.

आयुर्वेदात याला अनन्यसाधारण महत्व आहे. असंख्य आजारांवर उपचार करता येतो. वटवृक्षाचे मुळाचे लाकूड लवचिक व अधिक बळकट असते. तंबूचे खांब, बैलगाड्यांचे जू व दांडे इत्यादीच्या निर्मितीसाठी उपयोग होतो. च्या लाकडापासून कागदाचा लगदा तृयार करण्यात येतो. 

सालीच्या धाग्यापासून दोर तयार होतो. चिकांपासून चिकट डिंक बनताे. पानांपासून पत्रावळी, द्रोण तयार होतो. कोवळ्या फांद्या व पानांचा शेळ्या, मेंढ्या व इतर गुरांना चारा म्हणून उपयोग होतो. हत्तींना हा चारा आवडतो. इतका उपयोगी वृक्षाच्या केवळ श्रध्दा म्हणून फांद्या तोडून आपण पर्यावरणाची हानी करत आहोत.

या साध्या सुध्या घटनेला यम आणि यमाने घेतलेली परिक्षा या मिथ्थकाचा आधार घेत खऱ्याखुऱ्या घटनेचा आशय बदलून टाकला. या घटनेचा मूळ गाभा सावित्रीने दाखवलेली समयसुचकता आणि तिने केलेल्या त्वरीत उपचाराने सत्यवानाचे वाचलेले प्राण.

एका बुध्दीमान, चाणाक्ष स्त्रीची कथा न राहता त्यात दंतकथाचा समावेश होत होत सावित्रीच्या घटनेची वटपोर्णिमेची कथा झाली.. आपण या कर्मकांडामध्ये अडकून वर्षानुवर्षे वडाला दोरे बांधण्यात आणि त्याची कत्तल करण्यात धन्यता मानू लागलो.

व्यासमहर्षींनाही ह्या घटनेवर आख्यान लिहायचा मोह आवरला नाही...त्यांनी  महापर्वामध्ये सावित्री आख्यान अतिशय सुंदर असे यम आणि सावित्री यांच्या मधील प्रश्नोत्तरे लिहले आहे..त्यात व्यासांनीसुध्दा सावित्रीला एक बुध्दीमान आणि चाणाक्ष स्त्री असेच म्हटले आहे.

समयसुचकता दाखवून पतीचे प्राण वाचवणारी सावित्री आणि स्वतः प्रचंड त्रास सहन करुन आपल्याला अक्षरओळख करुन देऊन ज्ञानाची दारे उघडून देणारी आपली माय सावित्रीबाई फुले.

आपण या अंधश्रध्देनी भरलेल्या कर्मकांडामध्ये न अडकून राहता या दोघींचा वारसा कृतीत आणून चालवणार असू तरच आपण सावित्रीच्या लेकी म्हणून घ्यायला पात्र आहोत. आपले सारे सण विज्ञानावर, हवामानाच्या दिशेने आखणी केलेले आहेत. तर कृपया डोळस होऊन जगूया आणि निसर्गाने दिलेला हा वटवृक्षरुपी नैसर्गिक 'व्हेण्टिंलेटर' आपण जपूया त्याचे संवर्धन करुया.

 - स्वप्नजा घाटगे यांच्या 'भारतीय सण, पदार्थ, पर्यावरण या पुस्तकातून साभार)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !