लखनौ - पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे कानपूरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुरक्षेला तैनात केलेल्या पोलिसांनी गाडी अडवली, त्यामुळे आजारी महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाला.
त्यामुळे या महिलेचा रुग्णालयात पोहचण्या अगोदरच मृत्यू झाला. कानपूर शहरातील रहिवासी वंदना मिश्रा या गंभीर आजारी होत्या. शुक्रवारी रात्री त्यांना रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. पण याच वेळी राष्ट्रपतींच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी वाहतूक व्यवस्था रोखली.
वंदना मिश्रा यांना रुग्णालयात नेण्यात उशीर झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद उत्तर प्रदेशच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री रेल्वेमार्गानं ते कानपूरलात दाखल होते. त्यांचे मूळ गाव शेजारच्या 'कानपूर ग्रामीण' जिल्ह्यात आहे.
वंदना मिश्रा यांचे वय ५० होते. त्याा 'इंडियन असोसिएशन ऑफ इंडिस्ट्रीज'च्या कानपूर विभागाच्या महिला विंग प्रमुख होत्या. वंदना मिश्रा या नुकत्याच कोविडमधून सुखरूप बाहेर पडल्या होत्या. गंभीर लक्षणे दिसू लागल्याने कुटुंबाने त्यांना एका खासगी रुग्णालयात हलवले होते.
याच दरम्यान कानपूरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आगमन झाले. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी ज्या मार्गावरून वंदना मिश्रा यांचं कुटुंब त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी निघाले होते, तो मार्ग पोलिसांकडून रोखण्यात आला. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.
त्यामुळे वंदना यांना रुग्णालयात पोहचवण्यासाठी उशीर झाला. रुग्णालयात पोहचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांवर सध्या टीका होत आहे. अत्यावश्यक मदतीची गरज असलेल्या महिलेला पोलिसांनी अडवल्याबद्दल रोष व्यक्त होत आहे.