बोगसगिरी उघड : तज्ञ डॉक्टर नसल्याने अखेर 'त्या' रुग्णालयाचा परवाना रद्द, 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष करणारा आरोग्य विभाग अडचणीत?

अंबड (MBP LIVE 24 टीम) :

दस्तुर खुद्द आरोग्यमंत्र्यांच्याच तालुक्यात शल्यचिकित्सक डॉक्टर असण्याचा नियम डावलून सुरू असलेल्या आस्था कोविड सेंटरचा परवाना रद्द करण्याची कारवाई आरोग्य विभागाने नुकतीच केली आहे. प्रसारमाध्यमांच्या रेट्यामुळे अखेर उशिरा का होईना आरोग्य विभागाला जाग आल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.


शल्यचिकित्सक डॉक्टर असल्याचा बनाव
शल्यचिकित्सक डॉक्टर असण्याचा बनाव येथील आस्था कोविड सेंटर मध्ये सुरू होता. कायदेशीर तज्ञ डॉक्टर नसताना देखील संबंधित रुग्णालयाने रुग्णांवर उपचार केले. यामध्ये अनेक रुग्ण दगावले आहेत. अखेर प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्याच्या रेट्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर झोपी गेलेल्या आरोग्य पथकाने उशिराने संबंधित कोविड रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली. मात्र, याकडे सुरुवातीपासून 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष करणारा आरोग्य विभाग चौकशीच्या फेऱ्यात सापडणार असल्याने भविष्यात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


दस्तुर खुद्द आरोग्यमंत्र्याच्याच जिल्ह्यातील प्रकार
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या तालुक्यात असे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्च २०२१ मध्ये गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. अंबड शहरात पाच खासगी रुग्णालयांना कोविंड उपचाराची मान्यता देण्यात आली होती.

आरोग्य विभागाला उशिराने जाग
आरोग्य विषयक नियम तपासण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जे. ए. तलवाडकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने तब्बल तीन महिने काहीच तपासणी केली नाही. अखेर उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी उशिरा का होईना संबंधित पथकाला नोटीस बजावली. त्यानंतर डॉ. तलवाडकर यांचे पथक सक्रिय झाले. दि. ९ जून रोजी तपासणी दरम्यान डॉ. तलवाडकर, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. सागर गंगवाल यांना संबंधित त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

तपासणी टाळणारी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात
शासनाने कोविड रुग्णालयाला परवानगी दिल्यानंतर रुग्णालयाची तीन महिने तपासणी केलीच नाही. यामुळे संबंधित यंत्रणेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रुग्ण संख्या संपुष्टात आली असून अनेक रुग्णालयांनी आपले खाजगी कोविड सेंटर बंद केले. तीन महिन्यानंतर आरोग्य विभागाने ही कारवाई केली, हे विशेष.



Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !