नवी दिल्ली (MBP LIVE 24) :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सध्या चर्चा होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर "कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे", असे केले जाणारे विधान अत्यंत चुकीचे व अपरिपक्व असल्याचे मत इंडियन कौन्सिल आफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या संसर्गजन्य आजार व साथ या विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी व्यक्त केले आहे.'आयसीएमआर'चा लंडनमध्ये अभ्यास सुरू
याबाबत डॉ. पांडा म्हणाले, की कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. हा विषाणू देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वर्तन करत आहे. देशात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे का या प्रश्नाचा वेध घेण्यासाठी आयसीएमआर सध्या लंडनमधील इम्पिरियल कॉलेजसोबत अभ्यास करत आहे. गणितशास्त्राच्या आधारे काही गोष्टी तपासून पाहिल्या जात आहेत.निष्कर्ष लवकरच जाहीर
त्याचे निष्कर्ष लवकरच जाहीर होतील. आयसीएमआरने देशव्यापी सिरो सर्वेक्षणाची चौथी फेरी नुकतीच पूर्ण केली. त्यातील निरीक्षणेही तिसऱ्या लाटेबद्दल काही भाकित करण्यास उपयोगी पडतील.
गर्दीतही वाढेना कोरोना
डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये विविध ठिकाणी प्रचंड गर्दी होऊनहीं आता कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत नाही. याचा अर्थ या साथीने तिथे कळस गाठला आहे.
प्रतिकारशक्तीची पातळीही उंचावली
असंख्य लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याने प्रतिकारशक्तीची पातळीही उंचावली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने लस घ्यायला हवी. तसेच मास्क परिधान करणे, सतत हात धुणे, शारीरिक अंतर राखणे हे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत.