अहमदनगर - करोना संसर्गाच्या संकटाने साऱ्या जगाला भेडसावले असताना या भीषण काळात हजारो सर्वसामान्य रुग्णांचे प्राण वाचविण्याचे अनमोल कार्य बूथ हॉस्पिटलने केले. हॉस्पिटल प्रशासन, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांच्या विषयी नगरकरांच्या मनात कायम कृतज्ञतेची भावना आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
बॉम्बे टिन चॅलेंज या मुंबईतील सेवाभावी संस्थेच्या वतीने बूथ हॉस्पिटलला सात लाख रुपयांच्या आरोग्यविषयक महत्वाच्या उपकरणांची व यंत्रसामुग्री जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर बाबासाहेब वाकळे होते. यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक गणेश भोसले, संस्थेच्या पदाधिकारी शोभना कासेल्ला (पेंटा), संजय चोपडा, जयंत येलुलकर, विनोद पेंटा संजय ढोणे, बूथ हॉस्पिटलचे प्रशासनाधिकारी मेजर देवदान कळकुंभे उपस्थित होते.
जयंत येलूलकर म्हणाले, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केलेली रुग्णांची सेवा हे माणुसकीचे दर्शन देणारा अनुभव आहे. यामुळें हजारो रुग्ण करोनाच्या संकटातून बरे होऊन आपल्या घरी सुखरूप गेले आहेत. बॉम्बे टिन चॅलेंजचे संस्थापक के. के. देवराज यांनी बुथला दिलेली यंत्रसामुग्रीची भेट ही रुग्णांसाठी कायम उपयोगी पडेल.
नगरची कन्या असलेल्या शोभना कासुल्ला (पेंटा) यांनी आपल्या जन्मभूमीसाठी काही करण्याची भूमिका घेत संस्थेच्या माध्यमातून योग्य वेळी आपल्या माहेरातील नगरकरांसाठी धावून आल्या. ही प्रेरणादायी बाब आहे.
विनोद पेंटा म्हणाले की, बहीण शोभना हिचा मुंबईहून संस्थेच्या वतीने मदत कुठे करावी असा जेव्हा निरोप आला. तेव्हा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी बूथ हॉस्पिटलला मदत करण्याचे सुचविले. त्यामुळेच ही मदत करण्याची भावना खऱ्या अर्थाने फलद्रुप झाली असे सांगितले.
मलाही या कार्यात सहकार्य करता आले याचा मनोमन आनंद वाटतो. यावेळी शोभना कासुला(पेंटा) यांचा आमदार जगताप व महापौर वाकळे यांनी सत्कार केला. डॉक्टर्स व नर्स यांनाही सन्मानित करण्यात आले. जयंत येलुलकर यांनी प्रास्तविक केले. तर प्रशासनाधिकारी मेजर देवदान कळकुंभे यांनी आभार मानले.
यावेळी हॉस्पिटलचे कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परेश कासूल्ला, नेहा उपलप, विनीत पेंटा, साहिल पेंटा, यश उपलप यांनी परिश्रम घेतले.