अहमदनगर (MBP LIVE 24 टीम) :
अहमदनगर जिल्ह्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी चक्क आरोग्य केंद्रातील लस चोरुन आणल्याचे समोर आले आहे. कर्जत तालुक्यातील चापडगाव केंद्रातून चोरलेली लस आष्टी तालुक्यातील कडा आरोग्य केंद्रात देताना हा प्रकार उघड झाला आहे. रंगेहात पकडलेल्या या आरोग्य कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सहा नातेवाईकांना द्यायची होती लस
कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रात विठ्ठल खेडकर हे आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. शनिवारी त्यांनी लसची बॉटल चोरून कडा आरोग्य केंद्रात आले. येथे आपल्या सहा नातेवाईकांना लस देण्यास सांगितले. परंतु हा प्रकार गंभीर असल्याने कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना सांगितले. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांना सांगितले. पवार यांनी तात्काळ या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गलथान कारभार चव्हाट्यावर
लस देण्यासाठी आणलेले नातेवाईक आणि संबंधित खेडकर नामक कर्मचाऱ्याने घातलेला गोंधळ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानिमित्ताने आरोग्य कर्मचरायांकडून होत असलेला गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
कारवाई करणार
या गंभीर प्रकाराबाबत लोकमत वृत्तवाहिनीने अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना संपर्क केला असता यावर त्यांनी ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी बोला म्हणत फोन डॉ. सांगळे यांच्याकडे दिला. ते म्हणाले, ही बाब गंभीर आहे. याची लगेच चौकशी करतो. हे जर खरं असेल तर तात्काळ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मी पालकमंत्री यांच्या बैठकीत आहे, नंतर सविस्तर बोलतो, असे म्हणत फोन ठेवला.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता कडा आरोग्य केंद्रातिल प्रकार समजला आहे. ही बाब गंभीर असून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. असे कोणी चूक करत असेल तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगितले. मात्र आता काय कारवाई होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे .
आरोग्य अधिकाऱ्यांनी शेवगावमध्ये लक्ष घालावे
अहमदनगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी लस गायब होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कर्जतच्या घटनेमुळे या तक्रारीत तथ्य असल्याचे उघड झाले आहे. मागे शेवगाव ग्रामीण रुग्णालयात देखील 300 लस पैकी 250 लस दिल्याचा प्रकार समोर आला होता. नागरिकांनी गोंधळ घातला होता. याच्या खोलात जाऊन चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज आहे.