टिम MBP Live24 - ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपाने दिला आहे. शनिवारी या विषयावर राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करुन भाजपने राज्य सरकारला हा इशारा दिला आहे. भाजप आक्रमक झाले असल्याचे दिसून आले.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे शनिवारी झालेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, यांनी आंदोलन केले.
राज्यात एक हजारांहून अधिक ठिकाणी हे आंदोलन झाले. आघाडी सरकारने वेळेत कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली असती तर हे आरक्षण रद्द झाले नसते. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची या सरकारची इच्छाच नाही असे वाटते आहे, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, ओबिसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ठाणे, मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, सोलापूरसह राज्यात बऱ्याच ठिकाणी चक्काजाम करण्यात आला. भाजपच्या या प्रस्तावित निषेधाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला. ठाण्यात गोंधळ निर्माण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.