अहमदनगर - अवतार मेहेरबाबा ट्रस्टची महिला कामगार कोरोनाने मयत झाली असता तिच्या मुलीस मेहेरबाबा ट्रस्ट व कामगारांनी एक दिवसाचा पगार देऊन सुमारे दोन लाख रुपयाची आर्थिक मदत दिली.
यावेळी ट्रस्टचे चेअरमन श्रीधर केळकर, ट्रस्टचे विश्वस्त रमेश जंगले, लालबावटा जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष अॅड.कॉ. सुभाष लांडे, सचिव सुधीर टोकेकर, युनियनचे युनिट अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, पोपट शिंदे, सुनिल काळभोर आदिंसह कामगार वर्ग उपस्थित होते.
अवतार मेहेरबाबा ट्रस्टची कर्मचारी संगीता शंकर नागणे कोरोनाने 28 एप्रिल रोजी मयत झाल्या. त्या लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यांना एक मुलगी असून, या मुलीच्या भविष्याचा विचार करता ट्रस्ट व कामगार युनियनने मदतीचा हात पुढे केला.
युनियनसह इतर कामगारांनी आपला एक दिवसाचा पगार नागणे यांच्या मुलीसाठी जमवला. या मदतीचा धनादेश ट्रस्टचे व युनियनचे पदाधिकारी यांच्या हस्ते मयताच्या मुलीस प्रदान केला. कामगारांनी एक दिवसाचा पगार 73 हजार 348 रुपये तर ट्रस्टने 1 लाख 26 हजार 652 रुपये एकूण २ लाख रुपयाचा मदत दिली.