शेवगाव (टीम MBP LIVE 24) - तालुक्यात युरिया व रासायनिक खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज खानापूर येथे शेकडो शेतकरी खत खरेदीसाठी एकत्र आल्याने सोशल डिस्टन्सिंग चा पुरता फज्जा उडाल्याने शेतकऱ्यांचा जीव कोरोना संसर्गाच्या धोक्यात सापडल्याचे चित्र स्पष्ट झाले.
खतांच्या बाबतीत प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. याला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून खत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्रस्त शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
शेवगाव तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने दरवर्षी सुमारे चार ते पाच लाख मेट्रिक टन युरिया खताची आवश्यकता तालुक्यासाठी असते. याचे नियोजन प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.
परिणामी वेळेवर युरियासह रासायनिक खते उपलब्ध होत नसल्याने खत वाटपाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्यात युरियाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
शेतकर्यांना लाईनमध्ये टोकन देऊन खत पुरवठा केला जात आहे. या सर्व काळामध्ये फिजिकल डिस्टंसिंगचा मात्र बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. खतांचा तुटवडा असल्याने आज खत येणार हे समजल्यावर पहाटे 6 वाजल्यापासूनच शेतकऱ्यांनी खानापूर येथील खत दुकाना बाहेर रांग लावली आहे.
मात्र शेकडो शेतकरी एकत्र आल्याने सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडाला आहे. त्यामुळे हा खत तुटवडा आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.
संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
शेतकऱ्यांचा जीव धोक्यात
येथे वेळेवर खतं मिळत नाहीत. महिन्या-महिन्याने खतं विक्रीस येत असल्याने एकाच वेळी मोठया संख्येने शेतकरी खतं घेण्यासाठी कोरोना संकटात जीव धोक्यात घालून जमतात. कृषिविभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी बळी ठरत आहे. - अण्णा जगधने, सरपंच, खानापूर.
शेतकरी हवालदिल
खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बांदावर खत योजना गेली कुठे? योजना फक्त नावालाच राहतात. प्रत्यक्ष अनुभव वेगळाच आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.
- सुनील थोरात, ग्रामस्थ, खानापूर.
'10-26-26'ची बळजबरी का?
युरिया च्या आडून दुसरी खते बळजबरीने शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार शेवगाव तालुक्यात काही ठिकाणी घडत आहेत. 266 रुपयांची युरियाची गोणी घेण्यासाठी 1416 रुपयांची महागडी 10-26-26 या खताची गोणी विनाकारण घेण्यास दुकानदार बळजबरी करतात. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशा खत दुकानदारावर कायदेशीर कारवाई संबंधित प्रशासनाने करायला हवी. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. हा प्रकार त्वरित थांबायला हवा.
कृषी विभागाला कधी जाग येईल?
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांना आता वेग आला आहे. मात्र, कृषी विभागाने यासाठी शासनस्तरावर कुठलीही ठोस प्लॅनिंग अथवा तयारी केलेली नसल्याचे या खत तुटवड्यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. कृषी विभाग कुभकर्णी झोपेतून कधी जागा होणार, असा संतप्त सवाल पीडित शेतकरी करत आहेत.प्रशासनाला तमा न फिकीर
खताच्या नियोजनाचे गणित जुळवता न आलेल्या स्थानिक प्रशासनाच्या घोडचुकीमुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात पडला आहे. तसेच तुटवड्या मुळे होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी देखील प्रशासन हतबल असल्याचे दिसतेय. त्यामुळे प्रशासनास या गोष्टीची कुठल्याही प्रकारची तमा अगर फिकीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या वर्षीची पुनरावृत्ती
गेल्या वर्षी देशात व राज्यात आलेल्या करोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि मार्च ते जुलै पर्यंतच्या काळात युरिया मिळण्यास विलंब झाला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना याच संकटाला सामोरे जावे लागले होते. सध्या देखील शेतकर्यांची युरियासाठी मागणी मोठी असून त्या प्रमाणात खतांचा पुरवठा होत नाही.
बांदावर खत योजना गेली कुठे?
शेतकऱ्यांना बांधावर बियाणे आणि खतपुरवठा करण्याची योजना कृषी विभागाने तयार केलेली असल्याचे समजते. त्या अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खत आणि बियाणे उपलब्ध करून दिली जातात. यात बियाणेही शेतकरी समूह गटास पुरवली जातात. रोपनिर्मिती करून ती बांधावर लागवड केली जाणार होती. मग आता ही योजना कुठे गेली, असा सवाल शेतकरी करत आहेत.
केंद्राकडे मागणी करण्याची गरज
युरिया व रासायनिक खते निर्मिती व वितरण व्यवस्था ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांच्याकडूनही महाराष्ट्राला पुरेसा खत पुरवठा होऊ शकला नाही, असे चित्र आहे. मात्र, खतांचा तुटवडा निर्माण झालेला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे युरिया व इतर खतांची मागणी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते मिळायला हवीत. खत पुरवठ्यासाठी जबाबदार यंत्रणेने त्यादृष्टीने वेळीच तत्काळ पावले उचलायला हवीत.