अहमदनगर - केरळ मधील कोचीन शहरात संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात नगरच्या 'अनलाँक स्टोरी 1.0' या लघुपटाला 'उत्कृष्ट लघुपटा' चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या लघुपटाचे संकलन, लेखन आणि दिग्दर्शन कृष्णा बेलगांवकर यांनी केले आहे.
गेल्या वर्षी ऐन संचारबंदीच्या काळात चित्रित केलेल्या या लघुपटात विराज अवचिते, उत्कर्षा बोरा यांनी मुख्य भुमिका साकारल्या असून सहकलाकार म्हणून वृषभ कोंडावर आणि गौरव वाखारे यांनी काम केले आहे. लघुपटाचे चित्रीकरण भुषण गणूरकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू होती. या काळातही निष्काळजीपणाने वावरणाऱ्या तरुणाईवर भाष्य करणारा हा लघुपट सामाजिक संदेश देणारा उत्तम कलाकृती ठरला.
मुळ मराठी भाषेत संवाद असूनही महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार आणि आता केरळ सारख्या राज्यातही अनेक महोत्सवांत या त्याची दखल घेतली गेली. एक वर्षापुर्वी सावेडी येथील 'रंगभूमी मिडीया अँण्ड एंटरटेन्मेंट' या संस्थेने निर्मिती केलेला हा लघुपट आजही तितकाच महत्वाचा संदेश देणारा ठरतो.
मर्यादित साधने आणि टीमच्या आरोग्याची काळजी घेत सामाजित जागृतीच्या उद्देशाने रंगभूमी मिडीयाने हे पाऊल उचलले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आरोग्य तसेच पोलिस प्रशासन यांनीही या कामात मोलाचे सहकार्य केले होते.
या लघुपटाने गेल्या वर्षभरात अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. त्यात आणखी एक पुरस्काराचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.