खुलासा : डिग्री शिवाय कोव्हीड रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करा : विभागीय उपायुक्त गाडीलकर

नाशिक (MBP LIVE 24) :

"लसीकरण केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करा", असे मी म्हणालोच नाही अशी प्रतिक्रिया नाशिकचे विभागीय उपआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी 'MBP LIVE 24'शी संपर्क साधून दिली. खरेतर "डिग्री नसताना कोव्हीड रुग्णांवर बेकायदेशीरपणे उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करा", असे आदेश मी अहमदनगर महानगरपालिकेत बैठकीवेळी दिल्याचेही गाडीलकर यांनी सांगितले.

विभागीय उपआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर हे दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी कोव्हीड नियोजनाबाबत महानगरपालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांची बैठक गाडीलकर यांनी घेतली. त्यावेळी "लसीकरण केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करा", असे आदेश गाडीलकर यांनी दिल्याचे वृत्त छापून आले होते.

त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणात आरोग्य प्रशासन घालत असलेल्या घोळाबाबत सामाजिक दृष्टिकोनातून आंदोलने करणाऱ्या विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले होते. गाडीलकर यांच्या या वक्तव्याबाबत जाब देखील विचारला होता. विविध संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

या वक्तव्याबाबत निर्माण झालेल्या वादामुळे 'MBP LIVE 24' कडे आपली भूमिका मांडताना गाडीलकर म्हणाले, की मी असे कुठलेही वक्तव्य केलेले नाही. माझ्या नावाने छापून आलेले 'ते' वक्तव्य पूर्णपणे खोडसाळपणाचे आहे. डिग्री नसताना कोव्हीड रुग्णांवर बेकायदेशीर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करा असे मी म्हणालो होतो. मात्र, व्यवस्थित माहिती न घेताच परस्पर माझ्या नावे "लसीकरण केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करा" असे वृत्त छापण्यात आले. ते वृत्त पुर्णतः खोडसाळपणाचे व निराधार आहे.

"सामाजिक संघटनांनी
गैरसमज करून घेऊ नये"

मी तसे वक्तव्य केलेले नाही, ही सत्य परिस्थिती अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सामाजिक व राजकीय संघटना आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लक्षात घ्यावी. कुठलाही गैरसमज मनात ठेऊ नये. या गंभीर परिस्थितीत आपण करत असलेली मदत मोलाची आहे. खऱ्या अर्थाने आपण कोव्हीड योध्ये आहात. आपल्या मदतीची समाजाला व प्रशासनालाही गरज आहे. आपल्याला एकत्रितपणे लढा देऊन या संकटावर मात करायची आहे."
- गोरक्षनाथ गाडीलकर, विभागीय उपायुक्त, नाशिक
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !