अहमदनगर - शहरात गेले दोन महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच प्रशासनाने आता लसीकरण सक्तीचे केले आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर शहरात प्रचंड गर्दी होत आहे. सोमवारी ही गर्दी आटोक्याबाहेर गेली. नागरिकांचा संतापही टोकाला गेला अन् त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.
नगर शहरात जिल्हा शासगीय रुग्णालय, माळीवाडा, भिंगार, सावेडी, आलमगीर, मुकुंदनगर आदी परिसरात लसीकरण केंद्र आहेत. एक मेपासून शासनाने अठरा वर्षांवरील व्यक्तींनाही लस घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर आता गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
सोमवारपासून नगर शहरात कडक स्वरुपाचे लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहे. परंतु, लसीकरणाच्या नावाखाली अनेक जण घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. तसेच उपलब्ध साठा कमी, अन लोकांची गर्दी जास्त, यामुळे सर्वांना लस देणे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही.
अनेक लसीकरण केंद्रांवर स्थानिक लोकप्रतिनिधी दमबाजी करुन लसीकरण करुन घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी करुन आलेल्या लोकांचा संताप अनावर झाला. माळीवाडा येथे तर या लोकांनी मनपा आयुक्तांच्या विराेधात घोषणाबाजी करत रस्त्यावरच ठिय्या मांडला.
ही बातमी समजल्यानंतर आमदार संग्राम जगताप हे घटनास्थळी आले. त्यांनी लसीकरण केंद्रावर चौकशी केली. तसेच सर्व लोकांना व्यवस्थित लस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर लोकांनी आंदोलन मागे घेतले. इतर ठिकाणीही अशीच गर्दी दिसून येत होती.