गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलीस दलाचे केले कौतुक
गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणारे पोलीस मदत केंद्र कोटमी हद्दीत मौजा पैडी जंगल परीसरात पोलीस व नक्षलवादी चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना मारण्यात पोलीस विभागाला यश आले.
गडचिरोली दौऱ्यावर असलेले गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी पत्रकार परिषद घेवून गडचिरोली पोलीस दलाचे कौतूक केले. यावेळी वळसे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील गडचिरोली जवळील छत्तीसगड सीमेवरील नक्षलवादासंबंधी आपले मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सीमाभागात नक्षल प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करणार आहे.
दरवर्षी प्रमाणे तेंदुपत्ता हंगामाच्या पार्श्वभुमीवर खंडणी वसुल करण्याच्या उद्देशाने मोठया प्रमाणात नक्षलवादी एकत्र येतात. त्यामुळे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेरन, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, तसचे उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा पैडी जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबविले.
आज सकाळी ६:०० ते ७:३० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवादयांनी सी- ६० जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आव्हान केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. सी-६० जवानानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.
दिड तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलीसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळी ०६ पुरुष नक्षलवादी, ७ महीला असे एकुण १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळुन आले असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी माहिती दिली.
मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. तसेच यात एके ४७, एसएलआर, कारबॉईन, ३०३, १२ बोअर इत्यादी रायफल, भरपुर प्रमाणात स्फोटके मिळुण आले. तसेच नक्षलवाद्यांच्या दैनंदिनी जीवनात वापरात येणारे साहीत्य मिळुन आले.
सी-६० कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे दिलीप वळसे पाटील यांनी कौतुक केले. सदर भेटीवेळी संजय सक्सेना (भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक, विशेष अभियान, महाराष्ट्र राज्य मुंबई, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप-महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे उपस्थित होते.