पिंपरी चिंचवड : ‘बडा धमाका होगा, पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’ अशी सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसानिमित्त केलेली फेसबुक पोस्ट तिघा जणांना चांगलीच महागात पडली आहे. या तिघांना पोलिसांनी गजाआड केले असून ‘भाई का बड्डे’ आता तुरुंगात ‘साजरा’ होणार आहे.
फेसबुकवर काय होती पोस्ट ?
बुधवारी सराईत गुन्हेगार असणाऱ्या अजय काळभोर चा वाढदिवस होता. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्याच्या फेसबुक अकाऊण्टवरुन ‘कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पुरे पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’ अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली. सोमनाथ राजू देवाडे हा अजय काळभोर याचे फेसबुक अकाऊंट हाताळत होता.
त्यानंतर अजय काळभोरचा साथीदार प्रशांत सोनावणे यानेही अजयला शुभेच्छा देताना ‘भाऊ आमचा, बाप तुमचा’ अशी फेसबुक पोस्ट टाकली होती. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यामुळे पोस्ट टाकणाऱ्या भाईचा वाढदिवस चक्क पोलीस कोठडीत गेला. अजय विलास काळभोर, प्रशांत सोनावणे आणि सोमनाथ राजू देवाडे अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.