आर्थिक तडजोड : 'नगररचनाकार'चा अहवाल डावलून डॉ. बेडकेच्या 'अथर्व' हॉस्पिटलला 'तडजोडी'तून कोव्हीड केंद्र

खासगी कोव्हीड हॉस्पिटलमध्ये आग लागून अनेक रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या आहेत. असे असतानाही शेवंगावमध्ये मात्र नियमांना डावलून डॉ. विकास शंकर बेडकेच्या 'अथर्व' हॉस्पिटलला 'तडजोडी'तून नाहरकत दाखल देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. भविष्यात दुर्घटना होऊन रुग्णांच्या जीवावर बेतल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


शेवगाव (MBP LIVE 24) :

शेवगाव नगरपरिषदेचे सहायक नगररचनाकार यांचा जागा पाहणी अहवाल समोर आल्याने डॉ. विकास शंकर बेडके यांचे अथर्व हॉस्पिटलबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अथर्व हॉस्पिटलला कोव्हीड सेंटरच्या मान्यतेसाठी नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये, असा अहवाल दिलेला असताना परवानगी दिलीच कशी, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. 'आर्थिक' तडजोडीतून बोधेगावच्या एका डॉक्टर च्या मध्यस्थीतून नाहरकत दाखला देण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.


फाईलमध्ये दडलंय बरच काही
अथर्व हॉस्पिटलला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याबाबतचे कागदपत्रांच्या फाईलची सत्यप्रत मिळावी म्हणून कुद्दुस बिबन पठाण यांनी शेवगाव नगर परिषदेकडे अर्ज केला होता. त्यानुसार फाईलची सत्यप्रत मिळाल्यानंतर नाहरकत परवान्याचे गौडबंगाल समोर आले आहे. या फाईलमध्ये बरच काही दडलेले आहे. ते सर्व आता समोर येणार आहे.

काय म्हटलंय अहवालात
डॉ. विकास बेडकेने कोव्हीड सेंटरच्या मान्यतेसाठी आवश्यक शेवगाव नगरपरिषदेचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार सहाय्यक नगररचनाकार पठाण यांनी मिळकत क्रमांक 5408/2, 5408/3 व 5408/4 मधील अथर्व हॉस्पिटलची तपासणी करून अहवाल सादर केला. या अहवालात म्हटले आहे, की जागेवर मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलचे बांधकाम आहे. महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 कलम 44, 45 नुसार डबल जागेवर हॉस्पिटलचे बांधकाम करण्याकरिता नियमानुसार 6 मीटर सामासिक अंतर जोडणे बंधनकारक आहे. तसेच जागेसमोर 12 मीटर रस्ता आवश्यक आहे. मात्र, येथे बांधकामात सामासिक अंतरे सोडलेले नाही. याशिवाय हॉस्पिटल समोरील रस्ता हा फक्त 10 ते 15 फुटाचाच आहे. अशा कंजेकस्टेड जागेसाठी एनओसी दिल्यास व कोविड सेंटर उभारल्यास रुग्णांना सेवा देण्यात अडचणी येतील.

हे नियम फाट्यावर
- बांधकामाच्या बाजूने सामासिक अंतर सोडलेले नाही
- हॉस्पिटलसाठी आवश्यक 6 मीटरचा रस्ताच नाही
- तळमजल्यावर बांधकामाची परवानगी नसताना शटर टाकून उभारलेत गाळे
-तळमजल्यावर बेकायदेशीर कँटीन
- तळमजल्यावरच टाकलेत बेकायदेशीर रुग्णाचे बेड
- हॉस्पिटलला काचेच्या आवरणाने बेकायदेशीरपणे बंद केलंय. आग लागल्यास धोका वाढतो, गुदमरून लोकं मरतात.
-अर्धवट आग विरोधी यंत्रणा
- हॉस्पिटलमध्ये लिफ्ट हे इमारतीच्या बाहेर असणे बंधनकारक असताना ते चुकीच्या ठिकाणी आतमध्ये आहे. दुर्घटनेवेळी बाहेर पडता येत नाही.
-व्हेंटिलेशनसाठी सर्वबाजुनी जागा सोडणे आवश्यक असताना जागाच सोडलेली नाही
-नगरपरिषदेने दिलेल्या परवानगी पेक्षा केलेय वाढीव व अवैध बांधकाम


अनधिकृत, बेकायदेशीर हॉस्पिटल

2003 साली कलकत्ता येथे एका हॉस्पिटलमध्ये आग लागून अनेक रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. यानंतर सर्वोच न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हॉस्पिटल बांधकामासाठी केंद्रीय स्तरावर 2005 साली नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्या नियमानुसार हॉस्पिटलचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. मात्र, अथर्व हॉस्पिटलचे बांधकाम करताना डॉ. बेडके यांनी यातील बहुसंख्य सर्वच नियमांना फाटा देऊन रूग्णांच्या जीवावर बेतणारे अनधिकृत व बेकायदेशीर हॉस्पिटल उभारले आहे.

आग लागल्यास जबाबदार कोण?
देशात उत्तरप्रदेश, अहमदाबाद, सुरत येथे तर राज्यात मुंबई, नागपूर, ठाणे आदी ठिकाणी खासगी कोव्हीड हॉस्पिटलमध्ये आग लागून अनेक रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या आहेत. असे असताना नियमांना डावलून उभारलेल्या अथर्व हॉस्पिटलमध्ये आग लागल्यास अगर इतर एखादी गंभीर घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण?

स्फोटक व धोकादायक कँटीन
एखाद्या दुर्घटनेमुळे रुग्णाच्या जिवितास हानी पोहचू नये म्हणून हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करण्यास कायदेशीर परवानगी नाही. तसेच वीज, कुठलाही ज्वलनशील पदार्थ अगर वस्तू ठेवण्यास बंदी आहे. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अथर्व हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभारलेल्या अनधिकृत गाळ्यामध्ये बेकायदेशीर कँटीन चालवले जातेय. याठिकाणी असणारी गॅस टाकी ही स्फोटक बनली आहे. गॅसस्फोट होऊन दुर्घटना झाल्यास अनेक रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, तसेच अनेक जण जखमी होऊ शकतात. अशी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण?

यांना धरावे जबाबदार
बांधकामाच्या नियमांना डावलून, तसेच सहायक नगररचनाकार यांच्या अहवालाला डावलून उभारलेल्या या कोव्हीड सेंटरमध्ये दुर्घटना होऊन रुग्णांना जीव गमवावा लागला अथवा जखमी झाल्यास त्यासाठी सर्वस्वी डॉ. विकास बेडकेसह नियमांना डावलून परवानगी देणारे नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी, कोव्हीड सेंटरला परवानगी देणारे आरोग्यविभागाचे अधिकारी, या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करणारे संबंधित स्थानिक प्रशासन यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी.

उद्या वाचा... 

बोधेगाव कनेक्शन : अथर्व हॉस्पिटलला 'बोगस' परवानगी ? अधिकाऱ्याशी तडजोड करणारा बोधेगावचा 'तो' डॉक्टर कोण ?

- कोणी आणि का दिले नाहरकत?

- या तडजोडीसाठीचे काय आहे 'बोधेगाव कनेक्शन'?

- किती रुपयांची मागणी, किती रुपयांत ठरला सौदा ?

- तडजोडीचा मांडवली बादशाह कोण?

- तडजोडीत कोणकोण आहे सहभागी?
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !