सध्या टीव्हीवर क्रिकेटच्या 'आय.पी.एल' सामन्यांचा फिव्हर सुरु आहे. आयपीएल सामन्यांच्या दरम्यान अनेक जाहिराती येत असतात. अत्यंत कमी वेळेत महत्वाचा विषय जाहिरातींमधून मांडण्यात येतो. अशाच 'आयपीएल'च्या क्रिएटिव्ह जाहिरातींचे लेखन येथील आशिष निनगुरकर यांनी केले आहे.
'कल्पक कम्युनिकेशन्स' व 'आर.टी.व्ही' यांची संयुक्ती निर्मिती असलेल्या क्रिकेटमधील 'आय पी एल'च्या 'विनर ११' या ऍप संदर्भांत जाहिरातींमध्ये आशिष यांनी लेखनाची महत्वपूर्ण भूमिका बजावली असून हिंदीतील प्रसिद्ध कॉमेडियन किकू शारदा यांनी या जाहिरातींमध्ये भूमिका साकारली आहे.
मुळचा नगरचा असणारा आशिष सध्या मुंबईत वास्तव्य करत असून पोस्ट खात्यात नोकरी करत त्याने आपल्या कलेचा वसा जपला आहे. तो सिनेसृष्टीशी संबंधित अनेक क्षेत्रात कामे करत आहे.आशिषने आतापर्यंत अनेक चित्रपटात व मालिकांमध्ये त्याच्या भूमिकेतून अभिनयाची चुणूक दाखविली आहे.
त्याबरोबरच पटकथालेखन, चरित्रलेखन व गीतलेखन अशा क्षेत्रात तो आपली मुशाफिरी करत आहे. यापूर्वी त्याने अनेक वृत्तपत्रे, विविध मासिके व दिवाळी अंकांमधून त्याच्या लेखनाचे पैलू दाखविले आहेत. त्यांची काही पुस्तके देखील प्रकाशित झाले आहेत. बालमजुरीवर आधारित 'रायरंद' चित्रपटाचे संपूर्ण लेखन आशिषचे होते.
नगर जिल्ह्यातील वांबोरी येथे चित्रीकरण झालेला 'एक होतं पाणी' या सिनेमाचे लेखन, गीतलेखन व अभिनय देखील आशिषचे होते. अनेक जाणकार समीक्षकांनी चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाची नोंद घेतली व त्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
आशिषच्या कर्करोगाशी संबंधित 'आरसा' हा लघुपट व 'कॉमा' हा माहितीपट आणि कोरोना प्रबोधनात्मक 'नियम' व 'कुलूपबंद' तसेच 'संक्रमण' या लघुपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
यंदा 'आयपीएल' प्रेक्षकांविना सामने होत आहेत. त्यामुळे टीव्हीसमोर बसून प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यातील अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यातील काही जाहिरातींची क्रिएटिव्ह संकल्पना व लेखन नगरच्या आशिषचे आहे. या जाहिरातींमध्ये किकू शारदा यांच्यासोबत अनेक कलावंतांनी कामे केली आहेत.
तसेच 'व्ही.एफ.एक्स'च्या माध्यमातून आणखी या जाहिराती प्रभावी पद्धतीने मांडल्या आहेत.त्यामुळे सध्या 'आयपीएल'च्या जाहिरातींमध्ये आशीषची लेखणीचे कौतुक होतेय.