शेवगाव - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. पण या संकटावर मात करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षक पुढे सरसावले आहेत. येथे शासकीय कोव्हिड सेंटर उभारले जात आहे. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेत एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
शेवगाव तालुक्यात गोरगरिब रूग्णांना व गंभीर रूग्णांना शेवगावच्या कोव्हिड सेंटर मध्ये उपचार दिले जात आहेत. उपचाराच्या विविध उपाययोजना करताना अडचणी येत आहेत. हे लक्षात घेता तहसिलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांनी दानशूरांना मदतीचे आवाहन केले.
प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्राथमिक शिक्षकांनी गुरूवारी ( दि. १५ ) पासून स्वेच्छेने मदतनिधी जमा करण्यास सुरूवात केली. व्हॉट्स अपद्वारे केलेल्या आवाहनास तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या चार दिवसात ५ लाख रुपयांच्या निधीचे संकलन झाले आहेे.
या कार्यास सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक यांनी यथाशक्ति मदत करावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांनी केले आहे. शिक्षकांनी आपल्या कृतीमधून समाजासमोर चांगला आदर्श ठेवला आहे.
झेडपी अध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या सहकार्याने शेवगाव तालुका शैक्षणिक गुणवत्तेत अग्रस्थानी आहे.राज्यातील शिक्षक कोरोना संकट काळात सामाजिक उत्तरदायित्व निभावत आहेत. शेवगावमधील हा उपक्रम जिल्हा व राज्याला मार्गदर्शक असल्याची प्रतिक्रिया अॅक्टिव्ह टिचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केली आहे.
शेवगावच्या उपक्रमाचे गुरूकूलचे शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, शिक्षक परिषद तथा गुरूमाऊली मंडळाचे नेते रावसाहेब रोहकले, शिक्षक नेते राजेंद्र जायभाये, सदिच्छाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत, शिक्षक संघाचे नेते राजू शिंदे , अनिल आंधळे, सचिन नाब्दे आदींनी स्वागत केले आहे.
सभापती क्षितीज घुले यांनी केले कौतुक - रूग्णांना दिलासा देण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद व स्तुत्य आहे. पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले पाटील यांनी व्यक्त केले आहे.