मुंबई - कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अससा प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
कोरोना रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी राहील, यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, गृह विलगीकरणातील रुग्ण घरातच राहावेत, याची काळजी घ्यावी, त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित पोलिस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार द्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे, त्यांच्या घरावर स्टीकर लावणे, परिसरात बॅनर लावणे, कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणे, रुग्णांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती घेण्यासाठी कॉलसेंटर कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावेत, कोरोना उपचार केंद्रांत महिला रुग्णांची विशेष काळजी घ्यावी, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या, उपचारांचा व इतर सुविधांचा दर्जा चांगला ठेवा, पुरेशा प्रमाणात पंखे, एअर कुलर द्यावेत, शॉर्ट सर्किट होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.