नवी दिल्ली - केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशात येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने नुकतीच ही मोठी बातमी दिली आहे.
आता राज्य सरकारांना आता थेट लस उत्पादक कंपन्यांकडून डोस विकत घेता येणार आहेत. करोनामुळे देशातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त नागरिकांना कमीत कमी वेळेत करोनावरील लस मिळायला हवी. ही लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार गेल्या वर्षाभरापासून प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारांना आता थेट लस उत्पादकांकडून लसीचे डोस विकत घेता येतील. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना राज्य सरकारे आता लस देऊ शकतील. तसेच केंद्र सरकारची करोनावरील आधीची मोहिमही सुरूच राहणार आहे. प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरूच राहणार आहे.