व्हेंटिलेटर न मिळाल्याने एकीकडे रुग्ण दगावत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील अशा हलगर्जीपणामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
नाशिक - शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठकीनंतर जिल्हा रुग्णालयातील दिरंगाई आणि गलथान कारभाराबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर तासाभरातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
२२८ पैकी तब्बल 214 व्हेंटिलेटर पडून
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काल जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी नाशिक जिल्ह्यासाठी २२८ व्हेंटिलेटर आले असून त्यातील केवळ १९६ व्हेंटिलेटर बसवण्यात आले. त्यातील केवळ ग्रामीण मध्ये सात आणि जिल्हा रुग्णालयात सात असे एकूण १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या ८० व्हेंटिलेटर पैकी फक्त ७ व्हेंटिलेटर रुग्णांच्या वापरात होते आणि पैकी ७३ व्हेंटिलेटर हे नॉन कोविड भागात विनावापर पडून आहेत. तसेच २३ व्हेंटिलेटर अद्याप कार्यान्वित न करता तसेच जिल्हाभरात पडून आहेत.
नाशिक जिल्हा रुग्णालयात केवळ १०० बेड् कोरोनासाठी ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयामधील डेडिक्टेड कोरोना रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेले नाहीत. या हलगर्जीपणा आणि दिरंगाई बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना जाब विचारला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत.
बैठकीनंतर जिल्हा रुग्णालयाच्या दिरंगाई बाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क करून ही गंभीर परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर तासाभरातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
कोरोनासाठी केवळ १०० बेड्स
आरोग्य मंत्र्यांना फोन
इतर जिल्ह्यातील आढावा घेणार
आरोग्य मंत्र्यांनी नाशिकच्या या घटनेची गंभीर दखल घेतली असून राज्यातील इतर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये आणि तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदीचा देखील आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाचा देखील आढावा घेण्यात येणार आहे. या ठिकाणी असाच गलथान कारभार निदर्शनास आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवरही तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे.