पुणे - शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि वाढते मृत्यूचे प्रमाण पाहता कठोर निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त यांनी कोरोना आढावा बैठक घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच काही गोष्टींवर कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
पुण्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. एक आठवड्यासाठी पुणे शहरातील हॉटेल, बार आणि रेस्तराँ बंद राहणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याच पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक घेतली होती. दरम्यान, त्यांनी पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बार, हॉटेल आणि रेस्तराँ एक आठवड्यासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, या काळात होम डिलिव्हरी सेवा सुरू राहणार आहे.
पुणे शहारातील पीएमपीएलची बस सेवादेखील एक आठवड्यासाठी बंद राहणार आहे. तसेच शहरात होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांवर एक आठवडयासाठी बंदी घालण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राव यांनी दिली आहे.