मुंबई - ‘सर्वांसाठी घर’ हे शासनाचे धोरण असून 'पुणे म्हाडा’ने आणलेली घरांची लॉटरी हे त्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ही योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व फसवणुकीला बळी पडू नका. स्वत:च्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी या योजनेत अर्ज करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे (म्हाडाचा विभागीय घटक) यांच्या वतीने २ हजार ८९० सदनिकांच्या लॉटरी योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेचे ऑनलाईन उद्घाटन केले.
या कार्यक्रमाला गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर (सर्वजण ऑनलाईन पद्धतीने) हे मान्यवर उपस्थित होते.