पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याकांडातील 'मास्टरमाइंड'ला कोण घालतंय पाठीशी ?

मुंबई - राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची चौकशी करावी, तसेच या हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी केली आहे.


यासंदर्भात त्यांनी एका निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. 
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे काल दुपारी समाजकंटकांनी अपहरण केले होते. रात्री त्यांचा मृतदेह मिळाला या घटनेबद्दल एस. एम. देशमुख यांनी तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली आहे. 

एका पत्रकाराचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याची निर्दयपणे हत्या होते, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाच्छनास्पद आहे. दातीर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून राहुरी परिसरातील अनेक गैरकृत्य उजेडात आणली होती. 

लोकांच्या हक्कासाठी लढताना अनेक हितसंबंधी त्यांचे शत्रू झाले होते. दातीर यांच्या हत्येनं ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत, अशाच धेडांनी त्यांची हत्या घडवून आणली असावी असा अंदाज देशमुख यानी निवेदनात व्यक्त केला आहे.

निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

ही तर पत्रकारितेचीच हत्या

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. राहुरी तालुक्यातील अनेक प्रकरणांना दातीर यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली होती. दातीर यांची हत्या म्हणजे पत्रकारितेचीच हत्या आहे. या घटनेचा मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीतर्फे तीव्र निषेध करत आहोत. दातीर यांच्या हल्लेखोरांना तातडीने अटक करून कडक शिक्षा द्यावी. 
- मन्सूरभाई शेख 
नाशिक विभागीय सचिव
(मराठी पत्रकार परिषद)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !